विशाल शिंदे

पुणे: पुण्यातील प्रसिद्ध सिंहगड किल्ल्यावरून एक अतिशय धक्कादायक आणि भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. सिंहगडावरून खाली येत असताना पूजा चव्हाण आणि सौरव साळुंखे या दोन पर्यटकांच्या दुचाकीचा ब्रेक अचानक निकामी झाला. ब्रेक फेल झाल्यामुळे त्यांचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि त्यांची दुचाकी थेट “11 हजार पॉईंट” या धोकादायक ठिकाणाहून खोल दरीत कोसळली.

या भीषण अपघाताची माहिती वनविभागाचे कर्मचारी समाधान पाटील यांनी तात्काळ हवेली आपत्ती व्यवस्थापन रेस्क्यू टीमला दिली. जखमींना तातडीने उपचाराची आणि मदतीची गरज असल्याने, हवेली पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रेस्क्यू टीम घटनास्थळाकडे रवाना झाली.
यानंतर वनविभाग, वन समितीचे कर्मचारी शांताराम लांगे व त्यांचे सहकारी, स्थानिक नागरिक, पर्यटक आणि हवेली आपत्ती व्यवस्थापन टीम यांनी संयुक्तपणे रेस्क्यू ऑपरेशन राबवले. सर्वांच्या अथक प्रयत्नांमुळे दरीत कोसळलेल्या दोन्ही जखमींना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.
या अपघातात पूजा चव्हाण हिच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून, प्राथमिक माहितीनुसार तिचा पाय 2 ते 3 ठिकाणी फ्रॅक्चर झाला आहे. तर दुसरा जखमी युवक सौरव साळुंखे याच्या डोक्याला गंभीर मार लागला असून त्याच्या नाक आणि कानातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव सुरू होता. दोघांचीही परिस्थिती अत्यंत चिंताजनक असल्यामुळे तातडीने 108 रुग्णवाहिकेला (Ambulance) संपर्क करण्यात आला.
परंतु, रुग्णवाहिका येण्यास विलंब होत असल्याचे पाहून वेळ न घालवता हवेली आपत्ती व्यवस्थापनाच्या रेस्क्यू स्कॉर्पिओ वाहनातूनच दोन्ही जखमींना उपचारासाठी पाठवण्यात आले. यानंतर जखमींच्या नातेवाईकांना अपघाताची माहिती देण्यात आली. नातेवाईकांच्या विनंतीनुसार या दोन्ही जखमींना पुढील उपचारासाठी पुण्याच्या भारती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून, तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.







