पुणे: पुण्यातील ताडीवाला रोड परिसरात अॅसिडसदृश रासायनिक पदार्थ फेकून तरुणी आणि तिच्या मित्रावर हल्ला केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या प्रकरणात पुणे पोलिसांनी कर्नाटकमधून आरोपीला अटक केली असून घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. जखमी दोघांवर उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, 20 मे रोजी पहाटे सुमारे 2 वाजता ही घटना घडली. पीडित 21 वर्षीय तरुणी आणि तिचा मित्र हे पुण्यातील एका हॉटेलमध्ये काम करतात. काम आटोपल्यानंतर दोघे ताडीवाला रोड परिसरातील त्यांच्या राहत्या घराकडे जात होते.
यावेळी आरोपी श्रीराम मधु सरुनवर (वय 20) हा तेथे दबा धरून बसल्याचा आरोप आहे. प्राथमिक तपासात, पीडित तरुणी मित्रासोबत राहत असल्याच्या रागातून आरोपीने हा हल्ला केल्याचे समोर आले आहे. त्याने तरुणीचा रस्ता अडवून वाद घातला आणि त्यानंतर अॅसिडसदृश ज्वलनशील रासायनिक पदार्थ तिच्यावर फेकल्याचा आरोप आहे.
या हल्ल्यात तरुणीच्या मानेवर, पाठीवर आणि दोन्ही पायांवर गंभीर भाजल्या गेल्याच्या जखमा झाल्या. तिच्या मित्रालाही या हल्ल्यात दुखापत झाली असून त्याच्या पायाला इजा झाल्याचे सांगितले जात आहे. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला.
या प्रकरणाची माहिती मिळताच बंडगार्डन पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. गुन्हे शाखेने तांत्रिक तपास आणि शोधमोहीम राबवत आरोपीचा माग काढला आणि कर्नाटकमध्ये जाऊन त्याला अटक केली.
या घटनेमुळे पुण्यात पुन्हा महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून हल्ल्यामागील नेमके कारण आणि वापरण्यात आलेल्या रासायनिक पदार्थाची तपासणी केली जात आहे.







