पुणे, ता. 26: पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील एका चहाच्या टपरीवर मित्रांसोबत चहा पीत असताना, अवैधरीत्या गॅस चोरी होत असल्याचे दिसल्याने फोटो काढले. म्हणून गॅस माफियांनी एका पत्रकारासह त्याच्या दोन मित्रांना जीवे मारण्याची धमकी देऊन लोखंडी पाईप व लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची घटना घडली आहे. एवढेच नाही तर अवैध धंदा चालकांनी त्यांच्या अंगावर लघुशंका केल्याचे घृणास्पद कृत्य केले आहे. या मारहाणीत एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना खडकी (ता. दौंड) (Daund News) ग्रामपंचायत हद्दीतील दयानंद हॉटेल परिसरात बुधवारी (ता.24) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

महावीर भानुदास वजाळे (वय 36, रा. आकुंभे ता. माढा जि. सोलापुर) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. त्यांच्यावर मदनवाडी (ता. इंदापूर) येथील भिगवण मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. याप्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात शेट्टी व शिंदे (दोघांचेही पुर्ण नाव व पत्ता माहीत नाही) व इतर 8 ते 10 अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महावीर वजाळे हे पत्रकार म्हणून काम करतात. वजाळे व मित्र अनिल आरडे व श्रीकांत मासुळे हे कुरंकुभ (ता. दौंड) येथील मित्राला भेटण्यासाठी गेले होते. त्यांचे काम आटोपल्यानंतर ते माघारी घरी चालले होते. तेव्हा ते पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील खड़की (ता. दौड ) गावच्या हद्दीत दयानंद हॉटेलजवळ असलेल्या एका चहाच्या टपरीवर चहा पिण्यासाठी थांबले होते. तेव्हा तेथे दोन गॅसच्या टॅन्कर मधुन अवैधरित्या गॅस चोरी चालु होती. याचे श्रीकांत मासुळे याने मोबाईल मध्ये फोटो काढले. तर महावीर वजाळे यांच्या हातात पत्रकारीतेचा बूम दिसल्याने तेथे हजर असलेल्या आठ ते दहा इसमांनी वजाळे, अनिल आरडे व श्रीकांत मासुळे यांना लाकडी पाईप व लाकडी दांड्याने मारहाण केली.

आरोपी शिंदे याने अनिल आरडे यांना तुला कोणी पाठविले ते सांगा नाहितर तुला जिव मारतो अशी धमकी दिली. तसेच याला बाहेर घेऊन जा याला चांगला सरळ करतो. आणि श्रीकांत मासुळे याने जर फोटो काढले असतील तर त्याच्या अंगावर गाडी घाला व जीव मारा. असे शिंदे यांनी त्याच्या सहकाऱ्यांना सांगितले. तर महावीर वजाळे यांच्या डोक्यात पाणी ओतले व त्यांच्या अंगावर लघवी केली. या मारहाणीत महावीर वजाळे यांच्या दोन बरगड्या व डाव्या हाताचा अंगठा फॅक्चर झाला आहे. तर अनिल आरडे व श्रीकांत मासुळे या दोघांना देखील मुका मार लागला आहे. याप्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता संहिता कलम 189 (2) (4), 190, 118(2), 118(1), 115(2), व 2017 चे कलम 4 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास दौंडचे उप विभागीय पोलीस अधीकारी बापुराव दडस करत आहेत.
दरम्यान, यावेळी बोलताना बापुराव दडस म्हणाले की, पत्रकारांची नोंदी नसताना देखील हा गुन्हा दाखल करून चौकशी सुरु केली आहे. या गुन्ह्यातील दोन आरोपींना अटक देखील करण्यात आली आहे. असे सांगितले आहे. परंतु, तो पत्रकार असो किंवा नसो मात्र या प्रकारानंतर दौंड पोलीस ठाण्यात अवैध धंदे सुरु असून पोलीस हफ्ते घेण्यास मशगुल असल्याचे चित्र समोर आले आहे.







