पुणे : पुणे शहरात संक्रातीच्या सणदिवशी चोरट्यांनी शहरात अक्षरशः धुमाकूळ घातल्याचे विविध घटनांमधून समोर आले आहे. चोरट्यांनी दुचाकीवर येऊन महिलांकडील तीन लाखांचे दागिने चोरुले आहे. या घटना पुणे शहरातील धनकवडी, वानवडी या परिसरात घडल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वानवडीमधील लष्करी रुग्णालयाजवळ दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील एक लाख वीस हजारांचे मंगळसूत्र चोरून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत एका महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही महिला वानवडी भागात वास्तव्यास आहे.
या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, मंगळवारी दुपारी पावणेबारा वाजेच्या सुमारास तक्रारदार महिला दुचाकीवरुन लष्करी रुग्णालयाच्या परिसरातून जात होत्या. त्यावेळी महिलेच्या दुचाकीला स्वतःची गाडी आडवी लावून अडवले. आणि महिलेच्या गळ्यातील एख लाख वीस हजार रुपयांचे मंगळसूत्र घेऊन चोरटे पसार झाले आहेत. पोलीस उपनिरीक्षक धनाजी टोणे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
धनकवडी भागात दुसरी घटना
धनकवडी येथील दुसऱ्या घटनेत परिसरातील ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील एक लाख वीस हजार रुपयांचे मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना घडली आहे. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला धनकवडी भागातील चैतन्यनगर परिसरात राहायला आहे. मंगळवारी दुपारी त्या धनकवडीमधील त्रिमूर्ती चौकातून जात होत्या. दुचाकीस्वाराबरोबर असलेल्या साथीदाराने महिलेच्या गळ्यातील एक लाख बावीस हजार रुपयांचे मंगळसूत्र लंपास केले. सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पाटील या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.