पुणे: सिंहगड रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना लवकरच वाहतुकीची कोंडीपासून दिलासा मिळणार आहे. फन टाईम चौक ते विठ्ठलवाडी दरम्यान उभारण्यात आलेला सुमारे दीड किलोमीटर लांबीचा तिसरा उड्डाणपूल येत्या ऑगस्ट महिन्याच्या मध्यात वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे, अशी माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त पृथ्वीराज बी.पी. यांनी दिली.

या पुलाचे काम अंतिम टप्प्यात असून दोन्ही बाजूंनी रॅम्प तयार करणे आणि पुलाखालचा रस्ता काँक्रीट करणे अशी प्रमुख कामे पूर्ण झाली आहेत. सध्या काही किरकोळ कामे उरली असून, पावसामुळे कामात अडथळा येत असला तरी पुढील दोन आठवड्यांत पुलाचे काम पूर्ण करून तो वाहतुकीसाठी खुला केला जाईल, असे अतिरिक्त आयुक्तांनी सांगितले.
दोन टप्पे आधीच पूर्ण
सिंहगड रस्त्यावरील वाहतूक सुलभ करण्यासाठी तीन टप्प्यांमध्ये उड्डाणपुलांची उभारणी करण्यात आली आहे.
पहिला टप्पा: राजाराम पुल चौक ते विठ्ठलवाडी जंक्शन दरम्यानचा पूल मागील वर्षी खुला करण्यात आला.
दुसरा टप्पा: विठ्ठलवाडी जंक्शन ते फन टाईम चौक दरम्यानचा पूल जानेवारी 2025 मध्ये सुरू झाला.
तिसरा टप्पा: आता फन टाईम चौक ते विठ्ठलवाडी जंक्शन दरम्यानचा पूल लवकरच खुला होणार आहे.
सनसिटी ते कर्वेनगर पूल जोडणाऱ्या रस्त्याचा भूसंपादनाचा तिढा सुटला
मुठा नदीवर उभारण्यात आलेल्या कर्वेनगर पुलास सनसिटी भागातून जोडण्यासाठी लागणाऱ्या रस्त्याच्या भूसंपादनाचा तिढा अखेर सुटला आहे. संबंधित जमीन मालकांशी सकारात्मक चर्चा करून तोडगा काढण्यात आला आहे. कायदेशीर पूर्तता आठवड्याभरात होईल आणि त्यानंतर रस्त्याचे काम हाती घेतले जाईल.
कर्वेनगरच्या बाजूने दुधाणे लॉन्सपासून महालक्ष्मी लॉन्सकडे जाणाऱ्या रस्त्याचे काँक्रीटीकरण पूर्ण झाले असून, उर्वरित भागावर प्राथमिक मुरूम थर टाकण्यात आला आहे. भूसंपादन पूर्ण होताच उर्वरित कामे वेगाने पूर्ण केली जातील, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
नागरिकांना मिळणार पर्यायी मार्ग
या दोन्ही प्रकल्पांमुळे सिंहगड रस्ता, कर्वेनगर, धायरी तसेच प्रयेजा सिटी परिसरातील नागरिकांना पर्यायी रस्ता उपलब्ध होणार आहे. विशेषतः ह्यूम पाईप मार्गे सिंहगड रस्त्यावर प्रवेश करता येणार असल्याने वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
या संपूर्ण प्रक्रियेमुळे सिंहगड रस्त्यावरील वाहतूक व्यवस्था अधिक सुगम आणि गतिमान होईल, असा विश्वास अतिरिक्त महापालिका आयुक्तांनी व्यक्त केला आहे. लवकरच यासाठी विशेष ट्रॅफिक नियोजनही करण्यात येणार आहे.







