पुणे : घर बंद असल्याची संधी साधून कडी-कोयंडा तोडून सोन्याचे दागिने चोरणाऱ्या सराईत चोरट्याला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट-३ ने अहिल्यानगर जिल्ह्यातून अटक केली. फिलिप नादर चव्हाण (वय ३३, रा. चिचोंडी पाटील, ता. जि. अहिल्यानगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. चोरीच्या दागिन्यांची विक्री केल्यानंतर त्याच्या वाट्याला आलेली दोन लाख रुपयांची रोकड पोलिसांनी जप्त केली आहे. या प्रकरणी चाकण दक्षिण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

२४ जुलै रोजी शेलपिंपळगाव, ता. खेड येथील मोहितेवाडी परिसरात अमोल एकनाथ पोतले यांचे घर बंद होते. ही बाब हेरून चोरट्यांनी घराचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील लॉकरमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने चोरून नेले. घरफोडीची घटना लक्षात आल्यानंतर याबाबत पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली.

या गुन्ह्याचा तपास चाकण दक्षिण पोलीस ठाण्याच्या पोलिसांसह गुन्हे शाखा युनिट-३ कडून सुरू होता. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. तसेच पोलीस अंमलदार संदीप सोनवणे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीचा माग काढण्यात आला.

मिळालेल्या माहितीवरून पोलिसांच्या पथकाने अहिल्यानगर जिल्ह्यातील चिचोंडी पाटील येथे सापळा रचला. या कारवाईत फिलिप चव्हाण याला ताब्यात घेण्यात आले. त्याची चौकशी केली असता, त्याने साथीदार छगन चिंतामण काळे (रा. कडा, आष्टी, जि. बीड) याच्या मदतीने घरफोडी केल्याची माहिती पोलिसांना दिली.
चोरीचे सोन्याचे दागिने विकल्यानंतर मिळालेल्या पैशांपैकी चव्हाणच्या वाट्याला दोन लाख रुपये आले होते. ही संपूर्ण रोकड पोलिसांनी त्याच्याकडून जप्त केली आहे. या प्रकरणातील दुसरा आरोपी छगन काळे अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.






