पुणे : भाऊबीजेच्या दिवशीच भावा-बहिणीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना पिंपरी-चिंचवडमधील दिघी परिसरात घडली आहे. दिवाळीचा फराळ आणि भेटवस्तू देण्यासाठी माहेरी गेलेल्या दोन बहिणींना त्यांच्या सख्ख्या भावाने घरात येण्यास मज्जाव करत शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. यावेळी एका बहिणीच्या डोक्यात बेसबॉल स्टिकने वार करण्यात आल्याने ती जखमी झाली आहे. ही घटना ११ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी दोनच्या सुमारास गायकवाड नगर, दिघी येथे घडली.

या प्रकरणी पीडित महिलेने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, नितीन श्रीमंत नरळे (वय ४०, रा. दिघी) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला अनेक दिवसांनंतर आपल्या वृद्ध आई-वडिलांना भेटण्यासाठी माहेरी गेल्या होत्या. भाऊबीजेच्या निमित्ताने त्यांनी आई-वडिलांसाठी दिवाळीचा फराळ आणि भेटवस्तूही नेल्या होत्या. त्यावेळी फिर्यादी महिला, त्यांची मोठी बहीण आणि आई-वडील घरात एकत्र बसून गप्पा मारत होते.

दरम्यान, आरोपी भाऊ नितीन घरी आला. घरात दोन्ही बहिणींना पाहताच त्याने संताप व्यक्त करत त्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच, पुन्हा या घरात पाय ठेवला तर बघून घेईन, अशी धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.

वाद वाढल्यानंतर आरोपी नितीनने मोठ्या बहिणीच्या कानशिलात लगावली. त्यानंतर घरातील बेसबॉल स्टिक उचलून तिच्यावर हल्ला करण्यासाठी तो धावून गेला. मोठ्या बहिणीला वाचवण्यासाठी फिर्यादी महिला मध्ये पडल्या.
यावेळी संतप्त नितीनने हातातील बेसबॉल स्टिकने फिर्यादी महिलेच्या डोक्यावर वार केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात त्यांच्या कपाळाला गंभीर दुखापत झाली आणि रक्तस्राव झाला.
भाऊबीजेसारख्या सणाच्या दिवशीच घडलेल्या या घटनेमुळे दिघी परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून दिघी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.







