मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री रिंकू राजगुरू लवकरच एका नव्या आणि हटके भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तिच्या बहुचर्चित ‘जिजाई’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच मुंबईत एका दिमाखदार सोहळ्यात रिलीज करण्यात आला आहे. जेव्हापासून या सिनेमाचे पोस्टर समोर आले होते, तेव्हापासूनच प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. आता ट्रेलर रिलीज झाल्यानंतर चित्रपटाबद्दलची ही उत्सुकता आणखी वाढली आहे.

या चित्रपटाची कथा एका अत्यंत महत्त्वाच्या आणि गंभीर विषयावर भाष्य करते. कुटुंबाची जबाबदारी पेलत आणि संकटांचा सामना करत प्रत्येक स्त्री रोज बाहेर पडते. मात्र, तिच्या सुरक्षेचा आणि स्वाभिमानाचा प्रश्न कायम असतो. अन्याय निमूटपणे सहन करणे हीच तिची नियती आहे का, असा सवाल हा सिनेमा उपस्थित करतो. जेव्हा एखादी सामान्य स्त्री अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचा आणि लढण्याचा निश्चय करते, तेव्हा तिचे रूप किती उग्र आणि शक्तिशाली होऊ शकते, हे या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळणारे घनदाट जंगल, रात्रीचा काळोख, निर्मनुष्य रस्ता, बसमधील थरारक प्रवास, पोलिसांचा तपास आणि रिंकू राजगुरूचे दमदार अॅक्शन सीन्स अंगावर काटा आणणारे आहेत. विशेष म्हणजे, रिंकू पहिल्यांदाच अशा जबरदस्त अॅक्शन लूकमध्ये आणि धाडसी भूमिकेत दिसत आहे. तिच्या आयुष्यात नेमके काय घडते आहे, तिची कोणकोणत्या आव्हानांशी गाठ पडते आणि या संपूर्ण रहस्यामागे काय दडलेले आहे, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना 20 नोव्हेंबरची प्रतीक्षा करावी लागेल.

‘जिजाई’ या चित्रपटात केवळ रिंकूच नाही, तर इतरही अनेक दिग्गज कलाकार महत्त्वाच्या भूमिकांत पाहायला मिळणार आहेत. यामध्ये किशोर कदम, मयूर मोरे, रोहित कोकाटे आणि सानिका दिवाण यांसारख्या चेहऱ्यांचा समावेश आहे. या सर्व पात्रांचे आपापसात नेमके काय नाते आहे आणि कथेत पुढे कोणते मोठे ट्विस्ट येणार, याबाबत चित्रपटात मोठा सस्पेन्स ठेवण्यात आला आहे.

स्त्रीच्या अस्तित्वाची, स्वाभिमानाची आणि अन्यायाविरुद्धच्या संघर्षाची ही थरारक कथा असलेला ‘जिजाई’ चित्रपट येत्या 20 नोव्हेंबर रोजी आपल्या जवळच्या चित्रपटगृहांमध्ये रिलीज होत आहे. प्रेक्षकांसाठी हा सिनेमा एक वेगळा आणि रोमांचक अनुभव देणारा ठरेल यात शंका नाही.







