पुणे: शहरातील लोणावळा भागातुन धक्कादायक घटना समोर आली आहे. लोणावळ्यातील एका घरातून दोन वर्ष वयाच्या लहान मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न एका इसमाकडून केला जात होता. मात्र या व्यक्तीला वेळीच पकडून नागरिकांनी चांगलाच चोप दिला आहे. ही घटना लोणावळ्यात घडली. अमर त्रिपाठी नावाच्या एका इसमाला पोलिसांनी अटक केली आहे.
या प्रकरणाबाबत अधिकची माहिती अशी की, लोणावळ्यात घरात खेळत असलेल्या दोन वर्षीय लहानग्या चिमुकलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न आरोपी अमर त्रिपाठी या इसमाने केला होता. आरोपी रविवारी दुपारी एक वाजायच्या सुमारास चिमुकली राहत असलेल्या घरात शिरला आणि चिमुकलीला घेऊन पसार होणार तेवढ्यात चिमुकली मोठ-मोठ्याने रडायला लागली. चिमुकली का रडत आहे? हे पाहण्यासाठी चिमुकलीची आई घराबाहेर आली असता तेंव्हा आरोपी अमर तिला घेऊन पसार होण्याच्या तयारीत होता. तत्काळ घरातील व्यक्तींनी त्याला पकडले आणि चांगला चोप दिला आहे.
या प्रकरणी लोणावळा पोलिसांनी अमरला अटक केली आहे. अद्याप आरोपीने चिमुकलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न का केला? याचं कारण समोर आलेलं नाही. या प्रकरणात लोणावळा पोलिस अधिक तपास करत आहेत.