दौंड : दौंड येथील राज्य राखीव पोलीस बल (SRPF) गट क्रमांक ५ च्या मुख्यालय परिसरातून चंदनाचे झाड चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. मुख्यालयातील जुन्या रुग्णालयाच्या पश्चिम बाजूला असलेले सुमारे आठ ते दहा वर्षे वयाचे चंदनाचे झाड अज्ञात चोरट्याने तोडून चोरून नेले. या प्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०५ (ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी आठ वाजण्यापूर्वी ही घटना घडली. SRPF गट क्रमांक ५ मध्ये कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी विशाल काळे हे सहकाऱ्यांसह पेट्रोलिंग ड्युटी करत होते. त्यावेळी जुन्या रुग्णालयाच्या पश्चिम बाजूला चंदनाचे झाड कापलेले आढळून आले.
पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, अज्ञात व्यक्तीने चंदनाचे झाड कापून स्वतःच्या फायद्यासाठी चोरून नेल्याचे निदर्शनास आले. चोरीला गेलेल्या चंदनाच्या झाडाची किंमत अंदाजे सात हजार रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

घटनेची माहिती संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांनी स्थानिक कंपनी कमांडर सुनील लिंढे यांना दिली. त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत कळविले. वरिष्ठांच्या सूचनेनुसार दौंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार वैभव माने करीत आहेत. SRPF मुख्यालयाच्या परिसरात चंदनाच्या झाडाची चोरी झाल्याने परिसरात चर्चेला उधाण आले आहे.







