पुणे : दिवाळी सण तोंडावर असताना पुणे शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेतील तांत्रिक बिघाडांमुळे नागरिकांना सलग तीन दिवस पाणीटंचाईचा सामना करावा लागला. पर्वती जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत बिघाड आणि खडकवासला पंपिंग स्टेशनमधील वीजपुरवठा खंडित झाल्याने शहरातील अनेक भागांत पाणी उशिरा आणि कमी दाबाने मिळाले. पर्यायी वीजवाहिनीवर माकडामुळे शॉर्टसर्किट झाल्याने दोन रोहित्रे नादुरुस्त झाली. त्यामुळे पंपिंग स्टेशनचे काम जनरेटरवर सुरू ठेवावे लागले.

खडकवासला धरणातील पाणीसाठा कमी होत असल्याने पुणे महापालिकेने १० टक्के पाणीकपात लागू केली आहे. त्यानुसार १५ ऑक्टोबरपासून दर गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येत आहे. २९ ऑक्टोबर रोजी नियोजित साप्ताहिक पाणीपुरवठा बंद होता. त्यानंतर शुक्रवारी पर्वती जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत केबलमध्ये बिघाड झाला. परिणामी, ३५० एमएलडी क्षमतेचे जुने जलशुद्धीकरण केंद्र सुमारे चार तास बंद ठेवावे लागले. दुरुस्तीनंतर पाणीशुद्धीकरण आणि पुरवठा प्रक्रिया पुन्हा सुरू झाली.
शनिवारी खडकवासला पंपिंग स्टेशनला वीजपुरवठा करणाऱ्या महावितरणच्या एक्स्प्रेस फीडर केबलचे बांधकामादरम्यान नुकसान झाले. त्यामुळे स्टेशनचा वीजपुरवठा खंडित झाला. त्यानंतर अर्बन ग्राम एक्स्प्रेस फीडरद्वारे पर्यायी वीजपुरवठा सुरू करण्यात आला. मात्र, ओव्हरहेड वीजवाहिनीच्या संपर्कात माकड आल्याने शॉर्टसर्किट झाले आणि वीजपुरवठा पुन्हा खंडित झाला.

बिघाडाची दुरुस्ती केल्यानंतर तपासणीत पंपिंग स्टेशनवरील दोन रोहित्रे नादुरुस्त झाल्याचे आढळले. त्यामुळे तातडीने जनरेटरवर पंपिंग सुरू करण्यात आले. वारजे जलशुद्धीकरण केंद्राला पाणीपुरवठा करणाऱ्या पाचपैकी चार पंप जनरेटरच्या मदतीने सुरू ठेवण्यात आले. परिणामी, सुमारे ८० टक्के क्षमतेने पाण्याचा उपसा सुरू होता.
नादुरुस्त रोहित्रांची तातडीने दुरुस्ती शक्य नसल्याने पंपिंग स्टेशनचे संचालन आणि देखभाल करणाऱ्या मे. विश्वराज एन्व्हायर्नमेंट लिमिटेडकडून प्रत्येकी १२०० केव्हीए क्षमतेची दोन रोहित्रे भाडेतत्त्वावर उपलब्ध करण्यात आली. रविवारी एक रोहित्र कार्यान्वित करण्यात आले, तर दुसरे रोहित्र सायंकाळी सुरू झाले. त्यानंतर पंपिंग प्रक्रिया पूर्ववत करण्यात आली.
या तांत्रिक बिघाडांचा परिणाम शहराच्या मध्यवर्ती भागासह अनेक उपनगरांवर झाला. पेठा, पुणे स्टेशन परिसर, खराडी, वडगाव शेरी, भांडारकर रस्ता, कोथरूडचा काही भाग, मॉडेल कॉलनी, कर्वेनगर, शिवाजीनगर आणि औंध परिसरात पाणी उशिरा आणि कमी दाबाने मिळाले. दिवाळीच्या तयारीच्या काळात पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली.







