पुणे : पुण्यातील वडगावशेरी परिसरातील सोपाननगर येथे शासनाद्वारे बंदी असलेला गुटखा, पानमसाला तसेच सुगंधी तंबाखूची विक्री करणाऱ्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे. याप्रकरणी चंदननगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिलोकचंद्र रूपाराम भाटी (वय 18, रा. सोपाननगर, वडगाव शेरी, पुणे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस शिपाई शुभम किसन भोसले यांनी चंदननगर पोलिसांत फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे वडगाव शेरी येथील सोपाननगर भागात तेजस वाईन शॉपच्या शेजारी नावाचा बोर्ड नसलेले एक पान शॉप आहे. या पानशॉपमध्ये प्रतिबंधित वेगवेगळ्या कंपन्यांचा 47 हजार 476 रुपये किंमतीचा गुटखा, पानमसाला, सुगंधी तंबाखू अशा धूम्रपानयुक्त साहित्याची आरोपी विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. दरम्यान, चंदननगर पोलिसांनी रविवारी (ता.13 एप्रिल) या पानशॉपवर कारवाई केली. तसेच पानशॉपच्या चालकवर गुन्हा दाखल केला आहे.
चंदननगर पोलिसांनी याप्रकरणी भारतीय न्याय संहिता, राष्ट्रीय आपत्ति व्यवस्थापन कायदा 2005, सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने अधिनियम 2003, अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम 2006 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक प्रणील चौगुले तपास करीत आहेत.