पुणे: पुण्यात सुरू असलेल्या एमपीएससी परीक्षार्थींच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा पाठवल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. मात्र, भीमनवार यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी फेटाळून लावले आहे. त्यामुळे या दाव्यामुळे राजकीय वातावरण आणखी तापले आहे.

गेल्या सहा दिवसांपासून पुण्यातील गांजवे चौकात एमपीएससी परीक्षार्थींचे आंदोलन सुरू आहे. आमदार रोहित पवार यांनी विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर हे आंदोलन सुरू केले असून, दिवसेंदिवस आंदोलनाला वाढता प्रतिसाद मिळत असल्याचा दावा करण्यात येत आहे. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील नेत्यांसह कार्यकर्ते तसेच कला आणि साहित्य क्षेत्रातील काही मान्यवरांनीही विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठिंबा दिला आहे. एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याच्या मागणीमुळे सरकारवर दबाव वाढत असल्याचे चित्र आहे.
याच पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत भीमनवार यांनी राजीनामा पाठवल्याचा दावा केला. “परवा संध्याकाळी त्यांनी राजीनामा पाठवला आहे. आता निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घ्यायचा आहे,” असे पवार म्हणाले. भीमनवार हे मुख्यमंत्री फडणवीस यांचे मित्र असल्याचा उल्लेख करत, मित्राच्या राजीनाम्याचे काय करायचे हे आता मुख्यमंत्र्यांनी ठरवावे, असेही त्यांनी म्हटले.

यावेळी पवार यांनी संविधानातील कलम ३१७ चा दाखला देत एमपीएससी अध्यक्षांच्या चौकशीसंदर्भातील अधिकारांवरही भाष्य केले. तसेच, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत काय चर्चा होते, याकडे लक्ष असल्याचे सांगत निर्णय न झाल्यास पुणे बंदचा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी रोहित पवार यांच्या दाव्याचे खंडन केले. भीमनवार यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त चुकीचे असून रोहित पवार अफवा पसरवत असल्याचा आरोप त्यांनी केला. “त्यांनी थोडा संविधानाचा अभ्यास करावा, केवळ विद्यार्थ्यांच्या बळावर राजकारण करू नये,” अशी टीकाही बन यांनी केली. त्यामुळे भीमनवार यांच्या राजीनाम्याबाबतचा दावा आणि त्यावरील भाजपचे खंडन यामुळे एमपीएससी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय संघर्ष अधिक तीव्र झाला आहे.







