लोणी काळभोर, ता. 23 : वाघोली (ता. हवेली) परिसरातील विक्री परवाना नसलेल्या क्रशर आणि नियमभंग करणाऱ्या दगड खाणींवर महसूल प्रशासनाने मोठी कारवाई सुरू केली आहे. राज्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचनेनुसार ही मोहीम हाती घेण्यात आली असून प्रशासनाच्या कारवाईमुळे खाण-क्रशर चालकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

2025-2026 या आर्थिक वर्षात गौण खनिज उत्खननाची स्वामीत्व धनाची रक्कम न भरलेल्या खाणींवरही जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कठोर पावले उचलण्यात आली आहेत. नियमांचे पालन न करणाऱ्या खाणी व क्रशर यांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू करण्यात आली असून त्यामुळे अनेक व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.
जिल्हा प्रशासनाने यापूर्वी अनेकदा क्रशर मालक व खानपट्टा धारकांना नियमांचे पालन करण्याबाबत लेखी तसेच तोंडी सूचना दिल्या होत्या. यासाठी वारंवार बैठका घेऊनही काही जणांनी नियमांकडे दुर्लक्ष केल्याने अखेर कठोर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. विक्री परवाना न घेणारे तसेच स्वामीत्व धनाची रक्कम न भरणाऱ्या संबंधितांवर थेट कारवाईचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
दरम्यान, परिसरात वाढलेल्या धूळ व हवा प्रदूषणाबाबत नागरिकांकडून आलेल्या तक्रारींची दखल घेत प्रशासनाने ही मोहीम अधिक तीव्र केली आहे. या कारवाईमुळे खाण मालक व क्रशर चालकांना नियमांचे पालन करण्याचा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.
महसूल विभाग, महावितरण आणि पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त कारवाईत आज तब्बल दहा खाण-क्रशर चालकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. नियमबाह्य काम करणाऱ्यांवर पुढेही अशीच कारवाई सुरू राहणार असल्याची माहिती अपर तहसील कार्यालयाच्या तहसीलदार तृप्ती कोलते-पाटील यांनी दिली.







