अमित मुंडीक

पुणे: पुणे, दि. १४ फेब्रुवारी २०२६ (प्रतिनिधी) – दुचाकीवर ट्रिपल सीट प्रवास करणाऱ्यांविरोधात Pune City Police वाहतूक शाखेकडून १२ व १३ फेब्रुवारी रोजी शहरभर विशेष संयुक्त मोहीम राबविण्यात आली. वाहतूक विभाग व सर्व पोलीस स्टेशन यांच्या सहभागातून प्रमुख रस्ते, चौक आणि वाहतूक दाटीच्या ठिकाणी एकाचवेळी कारवाई करण्यात आली.
या मोहिमेदरम्यान २६४९ ट्रिपल सीट वाहनांवर कारवाई करण्यात आली. त्यापैकी ९८८ वाहने जप्त करण्यात आली असून २१३७ वाहनचालकांनी चलन तत्काळ भरले. या कारवाईतून शासनाकडे ₹२१,३७,००० इतकी रक्कम जमा करण्यात आली. याशिवाय एकूण १३,३०८ चलनांवर कारवाई करण्यात आली.
दरम्यान, दि. १०/०२/२०२६ पासून आजपर्यंत ट्रिपल सीट तसेच इतर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ५३८० वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून एकूण ₹१,०३,२५,१५० इतका दंड वसूल करण्यात आला आहे.
या विशेष मोहिमेत शहरातील ३० वाहतूक विभाग व ४४ पोलीस स्टेशन येथील अधिकारी व अंमलदारांनी सक्रिय सहभाग नोंदविला.
दुचाकीवर ट्रिपल सीट प्रवास करणे हा कायद्याने दंडनीय गुन्हा असून त्यामुळे अपघाताचा धोका वाढतो. नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करून सुरक्षित व शिस्तबद्ध वाहनचालना करावी. शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी व अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी अशा मोहिमा पुढेही सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे वाहतूक शाखेकडून स्पष्ट करण्यात आले.







