पुणे: पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या (Pune Traffic Diversion) प्रचाराची मंगळवारी सांगता झाली असून आता शहरात निवडणूक प्रक्रियेचा (Pune Election) प्रत्यक्ष टप्पा सुरू होत आहे. 14 जानेवारीला मतपेटी वाटप, 15 जानेवारीला मतदान आणि 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. या तीन दिवसांत शहरात वाहतूक कोंडी होऊ नये, तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी वाहतूक पोलिसांनी महत्त्वाच्या मार्गांवर प्रवेश बंदी आणि वाहतुकीत बदल जाहीर केले आहेत. (Latest Marathi News)

पिंपरी-चिंचवड ही राज्यातील महत्त्वाची औद्योगिक आणि निवासी महानगरपालिका असून निवडणुकीच्या काळात मोठ्या प्रमाणात हालचाल वाढते. मतदान केंद्रे, स्ट्राँग रूम आणि मतमोजणी केंद्रांभोवती सुरक्षेची कडक व्यवस्था ठेवण्यात आली आहे. त्यामुळे काही प्रमुख रस्ते तात्पुरते बंद ठेवण्यात येणार आहेत. निवडणुकीशी संबंधित वाहने आणि अत्यावश्यक सेवा वगळता इतर वाहनांवर हे निर्बंध लागू असतील.

भोसरी आणि चिखली परिसरात स्ट्राँग रूमच्या पार्श्वभूमीवर मोठे बदल करण्यात आले आहेत. भोसरीतील इंद्रायणीनगर येथील संत ज्ञानेश्वर क्रीडांगणाकडे जाणारा वैष्णवी माता मंदिर रोड आणि इंद्रायणी स्वीट कॉर्नर चौक 14 ते 16 जानेवारीदरम्यान सर्व वाहनांसाठी बंद राहील. कृष्णानगर भाजी मंडईकडून चिखली घरकुल टाऊन हॉलकडे जाणारे सेवा रस्तेही याच काळात बंद असतील. नागरिकांनी पुणे-नाशिक महामार्ग, सहारा चौक, साने चौक किंवा नेवाळेवस्ती हे पर्यायी मार्ग वापरावेत.
निगडी प्राधिकरणातील हेडगेवार भवन समोरील रस्ताही बंद करण्यात आला असून संभाजी चौकाकडून येणारी वाहतूक आकुर्डी पोलीस चौकीमार्गे हुतात्मा चौकाकडे वळवण्यात आली आहे. मतमोजणीच्या दिवशी म्हणजे 16 जानेवारीला चिंचवड ऑटो क्लस्टर परिसरातील राजमाता जिजाऊ चौक ते काळेवाडी एम्पायर पूल हा मार्ग सकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत पूर्णपणे बंद राहील.
मतदानाच्या दिवशी 15 जानेवारीला मोशी, दिघी-आळंदी, चहोली, थेरगाव, कासारवाडी आणि वाकड परिसरातही काही रस्ते जड वाहनांसाठी बंद राहतील. नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.
निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडावी आणि नागरिकांना कमीत कमी त्रास व्हावा, यासाठी हे बदल करण्यात आले असून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे.







