पुणे: पुण्यातील नामांकित रुबी हॉल हॉस्पिटल एका (Pune Ruby Hall Clinic) गंभीर आणि धक्कादायक प्रकारामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथील रहिवासी सुनीता भगत (वय 55) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर त्यांचा मृतदेह काही काळ ‘गायब’ असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला असून, हॉस्पिटल प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. (Latest Marathi News)

सुनीता भगत यांना 18 जानेवारी रोजी उपचारासाठी रुबी हॉल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मात्र 19 जानेवारी रोजी सकाळी डॉक्टरांनी त्यांच्या निधनाची माहिती नातेवाईकांना दिली. मृत्यूनंतर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून मृतदेह ताब्यात घेण्यासाठी नातेवाईक हॉस्पिटल प्रशासनाकडे गेले. मात्र, अपेक्षेप्रमाणे मृतदेह ताब्यात देण्यात आला नाही, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, बराच वेळ प्रतीक्षा करूनही मृतदेह देण्यात आला नाही. त्यानंतर अचानकपणे मृतदेह एका वेगळ्याच रुग्णवाहिकेतून हॉस्पिटलच्या बाहेर आणण्यात आला. हा प्रकार पाहून कुटुंबीय हादरून गेले. मृतदेह नेमका कुठे होता, तो दुसऱ्या रुग्णवाहिकेतून का आणण्यात आला, याबाबत विचारणा केली असता प्रशासनाकडून समाधानकारक उत्तर देण्यात आले नसल्याचा दावा नातेवाईकांनी केला आहे.
या घटनेमुळे कुटुंबीयांमध्ये तीव्र संतापाची भावना असून त्यांनी हॉस्पिटल प्रशासनाविरोधात तक्रार दाखल केली आहे. मृत्यूनंतर मृतदेहाची जबाबदारी, ओळख आणि हस्तांतरण ही प्रक्रिया अत्यंत संवेदनशील असते. अशा वेळी निष्काळजीपणा किंवा गोंधळ निर्माण होणे ही बाब केवळ कुटुंबीयांसाठी मानसिक आघात ठरत नाही, तर आरोग्य व्यवस्थेवरील विश्वासही डळमळीत करते.
या प्रकरणी सहाय्यक पोलीस आयुक्तांनी लिखित तक्रार प्राप्त झाल्याची माहिती देत कायदेशीर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले आहे. दरम्यान, नातेवाईकांनी रुबी हॉल हॉस्पिटलवर कठोर कारवाईची मागणी केली असून, प्रशासनाकडून अद्याप अधिकृत स्पष्टीकरणाची प्रतीक्षा आहे.







