पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील प्रवाशांसाठी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर जाणे आता अधिक सोयीचे होणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) स्वारगेट ते नवी मुंबई विमानतळ अशी थेट वातानुकूलित इलेक्ट्रिक बससेवा सुरू केली आहे. त्यामुळे खासगी वाहनांवर अवलंबून राहणाऱ्या प्रवाशांना आता सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय उपलब्ध झाला आहे. या सेवेमुळे विमानतळापर्यंतचा प्रवास अधिक सुलभ होण्याची अपेक्षा आहे.

या मार्गावर सुरुवातीला दोन इलेक्ट्रिक बसेस चालवण्यात येणार आहेत. प्रौढ प्रवाशांसाठी तिकीट दर ४४५ रुपये, तर लहान मुलांसाठी २३० रुपये निश्चित करण्यात आले आहेत. खासगी वाहनांच्या तुलनेत हा पर्याय अनेक प्रवाशांसाठी सोयीचा ठरू शकतो.

स्वारगेट बसस्थानकातून पहिली बस सकाळी ११.१५ वाजता सुटेल, तर दुसरी बस दुपारी २.३० वाजता रवाना होईल. या बसचा मार्ग स्वारगेट, वनाझ, चांदणी चौक, बालेवाडी, हिंजवडी फाटा आणि इंदिरा कॉलेज, वाकड असा असेल. या प्रमुख थांब्यांवरून प्रवाशांना बसमध्ये चढता येणार आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या प्रवाशांसाठीही बससेवा उपलब्ध असेल. विमानतळावरून सकाळी ६.३० वाजता आणि संध्याकाळी ६ वाजता बस सुटणार आहे. या सेवेला प्रवाशांकडून मिळणारा प्रतिसाद पाहून भविष्यात बसफेऱ्यांची संख्या वाढवण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
सवलतीचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांसाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) सुविधाही उपलब्ध ठेवण्याचे नियोजन आहे. हे कार्ड असलेल्या पात्र प्रवाशांना संबंधित ई-शिवशाही बससेवेसाठी लागू असलेल्या नियमांनुसार तिकीट सवलतीचा लाभ घेता येईल.
बससेवा सुरळीत चालण्यासाठी नवी मुंबई विमानतळावर स्वतंत्र पार्किंग, रांगेचे नियोजन करण्यासाठी क्यू रेलिंग आणि नियंत्रण कक्षासाठी जागा उपलब्ध करून देण्याची व्यवस्थाही करण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधून विमानतळावर जाणाऱ्या प्रवाशांना प्रवासाचे आणखी एक साधन उपलब्ध झाले आहे.







