पुणे : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. माळेगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांवर पैसे वाटल्याचा गंभीर आरोप पुरुषोत्तम जगताप यांच्या कार्यकर्त्यांनी केला असून, यासंबंधीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.यावर आता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मोठा खुलासा केला आहे.

या घटनेवर बोलताना निवडणूक निर्णय अधिकारी दिग्विजय आहेर यांनी सांगितले की, सुरुवातीला दोन गटांत जोरदार वाद झाला. त्यानंतर एका गटाने रोख रकमेसह तक्रार दाखल केली. माहिती मिळताच पोलीस आणि आचारसंहिता पथकाने घटनास्थळी धाव घेतली. सुरुवातीला पथकाच्या हाती काही लागले नव्हते, परंतु नंतर या प्रकरणात 2 लाख 2 हजार 300 रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली. सध्या दोन्ही बाजूंच्या तक्रारींच्या आधारे पोलीस अधिक तपास करत आहेत.
दरम्यान, या कारखान्याच्या 21 जागांसाठी उद्या मतदान पार पडणार आहे. पुणे आणि सातारा जिल्ह्यांत पसरलेल्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रात एकूण 27 हजार 700 मतदार आहेत. या निवडणुकीत 83 उमेदवारांचे भवितव्य पणाला लागले आहे.

प्रशासनाने मतदानासाठी 93 केंद्रांची उभारणी केली असून, सुमारे 750 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत मतदान चालणार असून, कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
12 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 वाजल्यापासून मतमोजणी सुरू होईल. प्रक्रिया जलद व्हावी यासाठी 93 टेबल लावले जाणार असून, संध्याकाळपर्यंत निकाल स्पष्ट होण्याची शक्यता आहे. आता हे मतदान शांततेत आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर असणार आहे.







