पुणे: होळी सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला (Pune Railway News) असून, गावी जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी वाढू लागली आहे. पुणे हे शिक्षण आणि नोकरीसाठी (Pune Station) मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झालेले शहर असल्याने उत्तर भारत, मध्य प्रदेश, बिहार, झारखंड आदी राज्यांकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या होळीच्या काळात अचानक वाढते. या पार्श्वभूमीवर संभाव्य चेंगराचेंगरी किंवा अपघात टाळण्यासाठी पुणे रेल्वे स्थानक प्रशासनाने यंदा विशेष नियोजन केले आहे. (Latest Marathi News)
गेल्या काही वर्षांत सणासुदीच्या गर्दीत गुदमरून मृत्यू किंवा गंभीर दुखापती झाल्याच्या घटना देशातील विविध स्थानकांवर घडल्या होत्या. अशा घटना टाळण्यासाठी यंदा गर्दीचे व्यवस्थापन अधिक शास्त्रीय पद्धतीने करण्यावर भर देण्यात आला आहे. स्थानकातील प्लॅटफॉर्मलगत असलेल्या पार्सल विभागाशेजारी स्वतंत्र होल्डिंग एरिया तयार करण्यात आला आहे. होळी विशेष गाड्यांचे प्रवासी थेट प्लॅटफॉर्मवर गर्दी न करता या होल्डिंग एरियामध्ये थांबतील. संबंधित गाडी येण्यापूर्वीच नियोजनबद्ध पद्धतीने त्यांना प्लॅटफॉर्मवर सोडले जाईल.
या होल्डिंग एरियामध्ये बसण्याची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सोय, मोबाईल चार्जिंग पॉईंट, चल स्वच्छतागृहे, पंखे तसेच ऊन, वारा आणि पावसापासून संरक्षणासाठी शेड उभारण्यात आली आहे. प्रवाशांना गाड्यांची अचूक माहिती मिळावी यासाठी इलेक्ट्रॉनिक फलक बसवण्यात आले आहेत. अतिरिक्त तिकीट काऊंटर आणि एटीव्हीएम मशीन सुरू करण्यात आले असून, आरपीएफ जवान आणि रेल्वे कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्यात आली आहे. मदत केंद्र आणि नियंत्रण कक्षही कार्यान्वित करण्यात आले आहेत.
हे नियोजन केवळ होळीपुरते मर्यादित न ठेवता दसरा, दिवाळी आणि छठपूजेच्या काळातही राबवले जाणार आहे. प्रवाशांनीही वेळेआधी स्थानकावर पोहोचणे, अधिकृत घोषणांवर लक्ष ठेवणे आणि अनावश्यक गर्दी टाळणे गरजेचे आहे. प्रशासन आणि प्रवासी दोघांनीही संयम बाळगल्यास सणाचा आनंद सुरक्षित प्रवासासह साजरा होऊ शकतो.







