पुणे: पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Pune Politics) भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांची संयुक्त रणनिती ठरवण्यासाठी पुण्यात महत्त्वपूर्ण कोअर (Murlidhar Mohol) कमिटी बैठक पार पडली. या बैठकीला केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील (Chandrakant Patil) यांची प्रमुख उपस्थिती होती. पुणे ग्रामीणमधील सर्व (Ajit Pawar) प्रमुख पदाधिकारी, आमदार आणि संघटनात्मक नेते या बैठकीला उपस्थित होते. (Latest Marathi News)

महापालिका निवडणुकांनंतर ग्रामीण राजकारणातही हालचालींना वेग आला असून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आता सर्वच पक्षांसाठी प्रतिष्ठेच्या ठरणार आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजप-शिवसेना महायुतीने पुणे जिल्हा परिषद निवडणूक पूर्ण ताकदीने लढवण्याचा निर्धार केल्याचं या बैठकीत स्पष्ट झालं.
बैठकीत सर्वप्रथम जिल्हा परिषद निवडणुकीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हा परिषदेत सत्तेत असलेल्या गटांनी जनतेसाठी नेमकी कोणती कामं केली, विकास कुठे थांबला आणि प्रशासनात कशी साचलेली सत्ता तयार झाली आहे, यावर सखोल चर्चा झाली. “वर्षानुवर्षे सत्ता असूनही ग्रामीण भागात मूलभूत प्रश्न तसेच आहेत. ही बाब जनतेपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आमची आहे,” अशी भूमिका भाजप प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांनी मांडली.
दुसऱ्या दिवशी पुन्हा प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत महायुती करून निवडणूक लढवण्याबाबत प्राथमिक चर्चा झाली. जिल्हा परिषदेतील एकूण जागांपैकी कोणत्या जागा भाजपकडे आणि कोणत्या शिवसेनेकडे राहतील, उमेदवारीसाठी कोणते निकष असावेत, स्थानिक ताकद, जातीय समीकरणं आणि विकासकामांचा ट्रॅक रेकॉर्ड कसा पाहायचा, यावर सविस्तर मंथन झालं.
दोन्ही पक्षांनी आपापल्या ताकदीचा आणि प्रभावाचा आढावा घेत प्राथमिक आराखडा तयार केल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. महायुती म्हणून निवडणूक लढवण्याची दिशा जवळपास निश्चित झाली असून जागावाटपावर अंतिम निर्णय लवकरच घेतला जाण्याची शक्यता आहे.
मात्र या बैठकीत एक महत्त्वाचा सूर ठळकपणे उमटला. जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) सोबत युती करण्यास स्पष्ट विरोध दर्शवला. स्थानिक पातळीवर राष्ट्रवादीसोबत अनेक वर्षांपासून संघर्ष असून कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे केवळ शिवसेनेसह महायुती करून पुढे जाण्याचा आग्रह अनेक पदाधिकाऱ्यांनी धरल्याची माहिती आहे.
“ग्रामीण भागात राष्ट्रवादीशी थेट राजकीय संघर्ष आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांची मानसिकता लक्षात घेणं गरजेचं आहे,” असं मत अनेक नेत्यांनी मांडल्याचं समजतं.
या बैठकीत संघटनात्मक तयारी, प्रचार यंत्रणा, बूथ स्तरावरची रचना, समन्वय समित्या आणि प्रचाराची दिशा यावरही सखोल चर्चा झाली. जिल्हा परिषद निवडणूक ही केवळ सत्ता बदलाची नाही, तर ग्रामीण विकासाची दिशा ठरवणारी लढाई असल्याचं नेतृत्वाकडून स्पष्ट करण्यात आलं.
या बैठकीला माजी राज्यमंत्री संजय (बाळाभाऊ) भेगडे, शिवसेनेचे आमदार विजयबापू शिवतारे, आमदार ॲड. राहुलदादा कुल, भाजप शहराध्यक्ष, मंडल अध्यक्ष आणि इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
महापालिकांनंतर आता ग्रामीण भागात राजकीय समीकरणं वेगाने बदलत असून पुणे जिल्हा परिषद निवडणूक ही राज्याच्या राजकारणासाठीही महत्त्वाची ठरणार आहे. भाजप-शिवसेना महायुतीची ही संयुक्त तयारी राष्ट्रवादीसाठी मोठं आव्हान ठरणार असल्याचं चित्र आता स्पष्ट होत आहे.







