Pune Police Bharati : पुणे : पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान पुन्हा एकदा धक्कादायक घटना समोर आली आहे. शिवाजीनगर येथील मैदानावर 1600 मीटर धावण्याची चाचणी देताना एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. पुरुषोत्तम बुरकुल असे या तरुणाचे नाव असून तो पोलीस होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भरती प्रक्रियेत सहभागी झाला होता. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. (Police Bharati)
मिळालेल्या माहितीनुसार, धावण्याच्या चाचणीदरम्यान पुरुषोत्तम चौथ्या फेरीत असताना अचानक कोसळला. उपस्थित अधिकाऱ्यांनी तातडीने त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

काही दिवसांपूर्वी संभाजीनगर येथेही अशाच प्रकारची घटना घडली होती. त्या पार्श्वभूमीवर पुण्यात घडलेल्या या घटनेमुळे उमेदवारांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित होत आहेत. भरती प्रक्रियेदरम्यान आवश्यक वैद्यकीय सुविधा आणि काळजी घेतली जाते का, यावर चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, पुरुषोत्तमच्या आकस्मिक मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलीस दलात सामील होण्याचे त्याचे स्वप्न अपूर्णच राहिले. या घटनेनंतर प्रशासनाने अधिक सतर्कता बाळगण्याची गरज व्यक्त केली जात आहे.







