पुणे : पुणे जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी साठलेल्या पाण्यामध्ये डासांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे. यामुळे पुणे शहरात यावर्षी आतापर्यंत सर्वात जास्त डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ झालेली आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
पुणे शहरात नगर रस्ता, औंध-बाणेर, हडपसर आणि सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या भागात मोठ्या संख्येने रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या २६ दिवसांमध्ये ५२ डेंगीच्या रुग्णांचे निदान झाले आहे. तर शहरात १ जानेवारी ते २५ जुलै या कालावधीत तब्बल १९५ रुग्णांची नोंद झाली आहे. अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, पावसाळ्यात मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया असे आजार दूषित पाणी व कीटकांच्या प्रादुर्भावामुळे पसरत असतात. आजार रोखण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून आवश्यक कार्यवाही करण्यात येत आहे. तरी, नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
प्रतिबंधात्मक उपाय
डासांचे प्रजनन रोखणे व डासांना चावण्यापासून प्रतिबंध करणे हे दोन महत्त्वाचे प्रतिबंधात्मक उपाय आहेत. डेंगीचे डासांच्या अळ्या स्वच्छ व स्थिर, साठलेल्या पाण्यामध्ये वाढतात. त्यामुळे असे पाणी साठू न देणे हा सर्वात महत्त्वाचा व परिणामकारक उपाय आहे. यासाठी रिकामे टायर, डब्बे, छोटी डबकी, तुंबलेल्या गटारी, परिसरात व गच्चीमध्ये साठेलेले पाणी आठवड्यातून एकदा रिकामे करणे आवश्यक आहे. तसेच घरातील टाक्या, पिंप, हंडे, फ्लॉवरपॉट, फ्रिजच्या खालचा ट्रे, कुलर्स हे सुद्धा आठवड्यातून एकदा रिकामे करावे. ज्या टाक्या वगैरे रिकामे करणे शक्य नाही त्यांना घट्ट झाकणाने बंद करावे. खिडक्या व दारांना जाळी बसवावी. खास करून लहान मुलांना अंग पूर्णपणे झाकेल असे कपडे वापरावे. शक्य झाल्यास डेंगीच्या रुग्णास स्वतंत्र मच्छरदाणीमध्ये सुरवातीचे ५ ते ७ दिवस झोपवावे.