Pune News : पुणे, ता. 7 : हडपसर–खराडी रोडवरील मुंढवा ब्रिज परिसरात वाहतूक नियमांची सर्रास पायमल्ली होत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. जीवाची पर्वा न करता अनेक दुचाकीस्वार थेट विरुद्ध दिशेने वाहने चालवत असल्याने अपघाताचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

दररोजच्या गर्दीच्या वेळी वेळ वाचवण्यासाठी काही बेफिकीर चालक वन-वे नियम धाब्यावर बसवून सर्रास उलट दिशेने गाड्या चालवताना दिसत आहेत. त्यामुळे समोरून येणाऱ्या वाहनचालकांना अचानक बाईक समोर आल्याने अपघात टाळणे कठीण होत आहे.

स्थानिक नागरिकांच्या मते, मुंढवा ब्रिज हा आधीच वाहतुकीच्या दृष्टीने संवेदनशील ठिकाण आहे. अशा बेकायदेशीर हालचालींमुळे परिस्थिती आणखी गंभीर होत आहे. अनेक वेळा थोडक्यात अपघात टळल्याच्या घटना घडल्या असून, मोठी दुर्घटना होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

नागरिकांनी संताप व्यक्त करत वाहतूक पोलिसांनी येथे तातडीने कडक कारवाई करावी, तसेच सीसीटीव्हीद्वारे दंडात्मक कारवाई वाढवावी, अशी मागणी केली आहे. नियम तोडणाऱ्या अशा स्टंटबाज चालकांवर आळा बसला नाही, तर भविष्यात मोठा अनर्थ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. “वेळ वाचवण्याच्या नादात जीव धोक्यात घालणाऱ्यांवर लगाम कधी बसणार?” असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.







