पुणे: पुणे शहरावर यंदा भीषण (Pune News) जलसंकटाचे सावट पसरले आहे. हे संकट निसर्गनिर्मित नसून प्रशासकीय उदासीनतेमुळे ओढावले आहे. पुणे महानगरपालिकेने जलसंपदा विभागाची तब्बल 932 कोटी 88 लाख रुपयांची पाणीपट्टी थकवली आहे. ही रक्कम येत्या 15 दिवसांत भरली नाही तर शहराचा पाणीपुरवठा खंडित करण्याचा खळबळजनक इशारा जलसंपदा विभागाने दिला आहे.

पुणे शहरासाठी वर्षाकाठी 11.60 टीएमसी पाणी मंजूर आहे. मात्र, शहराच्या विस्तारत्या गरजांमुळे पालिकेने 31 जानेवारीपर्यंतच 11.23 टीएमसी पाणी वापरले आहे. आता पालिकेच्या खात्यात केवळ 0.36 टीएमसी पाणी शिल्लक असून, ते जेमतेम 12 ते 15 दिवस पुरेल इतकेच आहे. खडकवासला धरणातून या मर्यादेबाहेर पाणी देण्यास जलसंपदा विभागाने स्पष्ट नकार दिला आहे.
केवळ मूळ पाणीपट्टी नव्हे, तर ‘अतिरिक्त वापराचा दंड’ हा या वादाचा मुख्य मुद्दा आहे. 2016 पासून महापालिका मंजूर कोट्यापेक्षा जास्त पाणी उचलत आहे. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या नियमांनुसार, मर्यादेपेक्षा जास्त वापर केल्यास पाणीपट्टीच्या तीनपट दंड आकारला जातो. महापालिकेने गेल्या वर्षी 8.84 टीएमसी अतिरिक्त पाणी वापरले, ज्याचा दंड लावल्यामुळे थकबाकीचा आकडा 900 कोटींच्या पार गेला आहे. दरम्यान, पाणीपट्टीभरली नाही तर पाणी पुरवठा खंडित केला जाणार आहे.







