तुषार सणस
Pune News : भोर : ‘पुणे प्राईम न्यूज’ने केलेल्या बातमीची दखल घेत पुणे-सातारा महामार्ग प्रशासनाने किकवी येथील जिवघेण्या खड्ड्यांची पुन्हा एकदा डागडुजी करण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. Pune News
खड्डयांची डागडुजी किती दिवस टिकणार;
पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावरून दररोज हजारो वाहने प्रवास करत असतात. या परिसरातून पुण्यात कामानिमित्त जाणाऱ्या प्रवाशांची संख्या देखील मोठी आहे. मात्र, महामार्गावरील खड्ड्यांमुळे नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. हा रस्ता तयार करताना भेसळयुक्त डांबराचा वापर केल्यामुळे पावसात डांबराचा थर वाहून गेला असून, जिवघेणे खड्डे पडल्याचा आरोप संतप्त नागरिक करत होते. याबाबतचे वृत्त ‘पुणे प्राईम न्यूज’ने प्रसिद्ध केल्यानंतर महामार्ग प्रशासनाने त्वरित दखल घेतली असून, पुन्हा एकदा डागडुजी करण्याच्या कामाला सुरुवात केली आहे.
या मार्गावरून प्रवास करताना मागील दोन दिवसांमध्ये सुमारे दोनशे गाड्यांचे टायर पंक्चर झाले तर काही वाहनांचे टायर फुटले असून, काही गाड्यांच्या रीम खराब झाल्याच्या घटना घडल्या आहेत. रस्त्यावर झालेल्या खड्ड्यांची नोंद घेत आमचे भोरचे प्रतिनिधी तुषार सणस यांनी बातमी केल्यानंतर रस्त्याची डागडुजी करण्याचे काम सुरू केले आहे. दरम्यान, महामार्ग प्रशासनाने याच रस्त्यावर पुढे पडलेले खड्डे देखील बुजवावेत, अशी मागणी होत आहे. Pune News
यापूर्वी प्रशासनाने केलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे दोन ते तीन दिवसांत पुन्हा रस्त्यावर खड्डे पडले होते. आता पुन्हा नव्याने काम सुरू केले आहे. या खड्यांची डागडुजी किती दिवस टिकणार, याकडे ‘पुणे प्राईम न्यूज’चे लक्ष आहे.