पुणे: पुणे जिल्ह्यातून एक धक्कादायक (Pune News) घटना समोर आली असून, दुकान मालकिणीच्या मानसिक त्रासाला कंटाळून एका तरुण कामगाराने आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सतत पोलिस तक्रारीची धमकी आणि पैशांची मागणी केल्याने 30 वर्षीय तरुणाने धावत्या रेल्वेखाली उडी मारून आपले जीवन संपवले. या प्रकरणी पोलिसांनी दोन महिलांसह सात जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. (Latest Marathi News)

आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव रामदास भरत पवार (वय 30) असे आहे. ही घटना सातारा जिल्ह्यातील लोणंद परिसरात घडली. रामदास हा पुण्यातील कोंढवा भागातील येवलेवाडी परिसरात असलेल्या ‘शीतल ग्लॅमअप युनिसेक्स सलोन’मध्ये काम करत होता. या सलोनची मालकीण शीतल काळे असल्याची माहिती आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामदासचा सलोनच्या मालकिणीसोबत काही कारणावरून वाद झाला होता. वादानंतर शीतल काळे, अरविंद काळे, सतीश सरोदे, नितीन सरोदे, श्रुती कन्हेरे, ऋषी कन्हेरे आणि मोहन सोनार, सर्व राहणार कोंढवा, यांनी रामदासला सतत धमकावण्यास सुरुवात केली. तुझ्याविरोधात पोलिसांत तक्रार करू, अशी धमकी देत त्याच्याकडे तब्बल 5 लाख रुपयांची मागणी करण्यात येत असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
या सततच्या मानसिक त्रासामुळे रामदास प्रचंड तणावात गेला होता. त्याने या त्रासाबाबत आधीच आपल्या बहिणीला माहिती दिली होती. आत्महत्येपूर्वी रामदासने एक सुसाईड नोट लिहिली असून, त्यामध्ये आरोपींकडून होणाऱ्या त्रासामुळेच आपण जीवन संपवत असल्याचा उल्लेख केला आहे.
30 डिसेंबर रोजी लोणंद रेल्वे स्टेशन परिसरात रामदासने धावत्या रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केली. घटनेनंतर त्याची बहीण रूपाली संतोष पुजारी यांनी येवलेवाडी पोलीस ठाणे येथे तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.






