तेहरान: जागतिक राजकारणात सध्या एक अत्यंत नाट्यमय वळण पाहायला मिळत आहे. ज्या होर्मुझ सामुद्रधुनीच्या जोरावर इराणने जगाला इंधन टंचाईची धास्ती दाखवली होती, त्याच समुद्रात आता अमेरिकेने इराणची पूर्णपणे कोंडी केली आहे. गेल्या 24 तासांत इराणच्या बंदरातून एकही जहाज बाहेर पडू शकले नाही, हे अमेरिकेच्या नव्या ‘सायलेंट प्रेशर’ तंत्राचे मोठे यश मानले जात आहे.

इराण आणि इस्रायलमधील संघर्ष शिगेला पोहोचल्यानंतर इराणने होर्मुझचा मार्ग रोखून धरला होता. मात्र, शस्त्रसंधीनंतर अमेरिकेने अत्यंत धोरणात्मक पाऊल उचलत या मार्गावर नौदलाची कडक नाकेबंदी लागू केली. धक्कादायक बाब म्हणजे, इराणकडे निघालेली सहा व्यापारी जहाजे समुद्रातूनच मागे फिरली आहेत.
होर्मुझची सामुद्रधुनी हा जगातील सर्वात महत्त्वाचा ‘ऑईल चोक पॉइंट’ आहे. जगातील एकूण खनिज तेलाच्या व्यापारापैकी सुमारे 20% व्यापार याच मार्गातून होतो. इराणच्या अर्थव्यवस्थेचा कणा तेल निर्यात आहे. ही जहाजे रोखल्यामुळे इराणची आर्थिक रसद थांबली आहे. अमेरिकेने इतर देशांची आंतरराष्ट्रीय वाहतूक मात्र सुरू ठेवली आहे.
ट्रम्प यांचा दावा
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या मोहिमेला आपले मोठे यश म्हटले आहे. “आम्ही हे पाऊल उचलले नसते, तर आज इराणकडे अणुशस्त्रे असती,” ट्रम्प यांच्या मते, हे युद्ध आता संपण्याच्या अगदी जवळ आहे.





