Pune News: पुणे: पुण्यातील (Pune) एका पर्यटकाचा कोकणातील काशीद समुद्रकिनारी बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रविवारी दुपारी घडली. सुटीचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या या तरुणावर काळाने झडप घातल्याने त्याच्या कुटुंबीयांवर आणि मित्रांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

हेही वाचा- कौतुकास्पद! कुंजीरवाडीच्या शाळकरी मुलीचा आदर्श; सापडलेले सोन्याचे मंगळसूत्र केले परत
मृत तरुणाचे नाव सोमनाथ राजेंद्र भोसले (वय 24) असे आहे. तो मूळचा शिर्डी येथील रहिवासी असून सध्या पुण्यातील हडपसर परिसरात राहत होता. सोमनाथ आपल्या काही मित्रांसोबत सुट्टी घालवण्यासाठी काशीद समुद्रकिनारी आला होता. रविवारी दुपारच्या सुमारास सर्व मित्र समुद्रकिनाऱ्यावर फिरत असताना सोमनाथ पोहण्यासाठी पाण्यात उतरला.
मिळालेल्या माहितीनुसार, समुद्रातील पाण्याची खोली आणि लाटांचा अंदाज न आल्याने तो हळूहळू खोल पाण्यात ओढला गेला. त्या वेळी समुद्रात लाटा जोरात असल्याने त्याला बाहेर येणे कठीण झाले. सोमनाथ अडचणीत आल्याचे लक्षात येताच त्याच्या मित्रांनी आरडाओरडा केला. स्थानिक नागरिकांनीही त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत तो पाण्यात बुडाला होता.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक बचाव पथक आणि पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. काही वेळाच्या शोधानंतर सोमनाथला समुद्रातून बाहेर काढण्यात आले. त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले.
या घटनेनंतर सोमनाथच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. काशीद समुद्रकिनारी मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. त्यामुळे समुद्रात उतरताना पर्यटकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी, समुद्रातील इशारे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन पोलिस आणि स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आले आहे. अशा घटना टाळण्यासाठी सुरक्षिततेच्या नियमांकडे दुर्लक्ष करू नये, असेही सांगण्यात आले आहे.







