पुणे: पुणे (Pune News) शहरात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. हडपसरमधील लक्ष्मीनगर परिसरात एका २५ वर्षीय नराधमाने मद्यधुंद अवस्थेत एका तरुणीच्या घरात घुसून तिचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना घडली आहे. पीडित तरुणीने दाखवलेल्या धैर्यामुळे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हडपसरमधील लक्ष्मीनगर भागात पीडित तरुणी आपल्या घरात एकटीच होती. हीच संधी साधून आरोपी कुणाल सोपान गायकवाड (वय २५, रा. बडकीनाला, हडपसर) हा दारूच्या नशेत धुत होऊन तिच्या घरात शिरला. त्याने तरुणीसोबत अश्लील वर्तन करण्यास सुरुवात केली आणि तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. अचानक ओढवलेल्या या प्रसंगामुळे तरुणी प्रचंड हादरली होती.
स्वतःचा बचाव करण्यासाठी पीडितेने आरडाओरडा केला, मात्र आरोपीवर त्याचा कोणताही परिणाम झाला नाही. त्याने तिची छेड काढणे सुरूच ठेवले. या भीषण प्रकारानंतर पीडितेने पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार नोंदवली.
लक्ष्मीनगर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून आरोपी कुणाल गायकवाडला बेड्या ठोकल्या. आरोपीने हे कृत्य मद्यधुंद अवस्थेत केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.







