लोणी काळभोर : वाहतूक कोंडी ही पुणे (Pune News) शहरातील एक गंभीर समस्या आहे. परंतु, या परिस्थितीतदेखील वाहतूक कोंडी सुरळीत ठेवून रस्त्यावरील सुरक्षा, सुव्यवस्था राखण्यासाठी वाहतूक विभागातील एका पोलीस उपनिरीक्षकाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांच्या याच कामगिरीची दखल घेऊन पुणे शहर पोलीस आयुक्तांनी गौरव केला आहे. (Latest Marathi News)

महाराष्ट्र पोलीस दलाचा 2 जानेवारी स्थापना दिवस सप्ताह स्वरूपात साजरा करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत. त्या अनुषंगाने परिमंडळ 6 अंतर्गत मुद्देमाल वितरण समारंभ गुरुवारी (8 जानेवारी) विमाननगर येथील सिम्बायोसिस स्कूल ऑफ इंटरनॅशनलच्या सभागृहात पार पडला. यावेळी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते वाहतूक विभागातील पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण नवगणे यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी पुणे शहर पोलीस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील व पंकज देशमुख, पोलीस उप आयुक्त हेमंत जाधव, निखील पिंगळे, सोमई मुंडे यांच्यासह पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण नवगणे हे मागील 32 वर्षापासून पोलीस दलात कार्यरत आहे. सध्या ते पुणे शहर वाहतूक विभागात काम करत आहेत. नवगणे यांनी वाहतूक शिस्त, नियोजन आणि नागरिकाभिमुख कामकाजात ठोस योगदान दिल्याने त्यांच्या कार्याची वरिष्ठ स्तरावर दखल घेण्यात आली आहे. लक्ष्मण नवगणे यांच्या या सन्मानामुळे वाहतूक विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.







