पुणे : शहरातील स्वारगेट परिसरात असणाऱ्या प्रसिद्ध सारसबागेत नमाज पठण केल्याप्रकरणी पाच ते सहा अनोळखी मुस्लिम व्यक्तींविरोधात स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आहे. ५ मे २०२२ रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास हा प्रकार घडला होता. याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार संदीप गोडसे यांनी तक्रार दिली होती. त्यानुसार भादवी २९५ (अ), १८८, १४३, मपोअधी ३७(१) (ई) सह १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहरातील स्वारगेट परिसरात असलेले सारसबाग हे प्रसिद्ध उद्यानापैकी एक आहे. या उद्यानामध्ये तळ्यातील गणपती मंदिर आहे. पुणे महानगरपालिकेच्या ताब्यात असणाऱ्या या उद्यानात ५ मे रोजी पाच ते सहा अनोळखी मुस्लिम व्यक्तींनी प्रवेश केला.
त्यानंतर त्यांनी सारस बागेतील गणपती मंदिराच्या पाठीमागे असणाऱ्या पत्र्याच्या शेड जवळील हिरवळीवर एकत्र येऊन नमाज पठण केले. त्यामुळे पालिकेच्या मुख्य उद्यान अधीक्षकांच्या आदेशाचे उल्लंघन करून गैर कायदेशीर मंडळी जमवून गैर कृत्य केले. इतर समाजाच्या भावना दुखावून जातीय तेढ निर्माण करण्यासाठी नमाज पठण केल्याचे उघड झाल्यावर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक संदे पुढील तपास करीत आहेत.