पुणे : पुणे शहरात मोकाट अथवा भटकी डुकरे दिसल्यास त्यांना ताबडतोब जप्त करून मारण्याचा निर्णय पुणे महापालिकेने घेतला आहे. मोकाट फिरणाऱ्या डुकरांच्या उपद्रवामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. तसेच मोकाट डुकरांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन अपघात होत आहे. यामुळे महानगरपालीकेने हा निर्णय घेतला आहे.
महापालिकेकडून शहरातील मोकाट डुकरे पकडण्यासाठी डुक्कर मुक्त मोहीम पुण्यात राबविण्यात येणार असल्याचे जाहीर प्रकटन महापालिकेकडून देण्यात आले आहे. शहरातील मोकाट डुकरांची समस्या गंभीर झाली आहे, त्यामुळे पालिकेकडून डुक्करमुक्त मोहीम हाती घेण्यात येणार आहे. तसेच महापालिका हद्दीत डुक्कर पाळऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती महानगरपालिकेकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, पुणे महापालिकेने एक जाहीर प्रकटन प्रसिद्ध करण्यात आले आहे. या प्रकटनामध्ये महापालिका अधिनियम अनुसूची 14 नियम ३ मध्ये कोणतेही मोकाट डुक्कर शहरात भटकताना आढळल्यास त्यास ताबडतोब मारून टाकता येईल आणि आयुक्त निर्देश देतील त्याप्रमाणे त्या डुकराच्या प्रेताची विल्हेवाट लावता येईल आणि अशा रितीने मारून टाकलेल्या कोणत्याही डुकराबद्दल भरपाई मिळविण्यासाठी कोणताही दावा करता येणार नाही.
त्यामुळे भटक्या डुकरांचा व्यवसाय करणाऱ्यांनी भटकी व मोकाट डुकरे त्वरीत महापालिका हद्दीबाहेर हलविण्यात यावी अन्यथा वरील प्रमाणे कारवाई केली जाईल असे आदेश देण्यात आले आहे.