पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रकल्पांना गती देण्याच्या अनुषंगाने काम सुरू झाले आहे. या प्रकल्पातील खराडी पासून खडकवासला आणि नळ स्टॉप ते माणिकबाग या मेट्रो मार्गावरील स्थानकांसाठी ‘रचनाकार सल्लागार समिती’साठी खासगी कंपन्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने निविदा मागविण्यास सुरुवात केली आहे.
5 मार्ग नव्याने प्रस्तावित
पुणे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील पहिल्या टप्प्यातील मेट्रो मार्गाचा विस्तार शेवटच्या टप्प्यात असताना आता दुसऱ्या टप्प्यातील 5 मार्ग नव्याने प्रस्तावित करण्यात आले आहेत. यामध्ये खडकवासला, स्वारगेट, हडपसर आणि खराडी या 25.51 किमी मार्गावर एकूण 22 स्थानके असणार आहेत. तर दुसरीकडे नळ स्टॉप, वारजे, माणिकबाग या 6.13 किमी मार्गावर 6 स्थानके असणार आहेत. यासाठी महामेट्रोने खासगी रचनाकार सल्लागार समितीची नेमणूक करण्यासाठी निविदा मागविल्या आहेत.
25.51 किमी मार्गावर एकूण 22 स्थानके असणार
खडकवासला ते खराडी मार्ग ( 25.51 किलोमीटर 22 स्थानके) खडकवासला, दळवेवाडी, नांदेड सिटी, धायरी फाटा, माणिकबाग, हिंगणे चौक, राजाराम पूल, देशपांडे उद्यान, उत्तर स्वारगेट, सेव्हन लव्हज चौक, पुणे कटक मंडळ, रेसकोर्स, फातिमानगर, रामटेकडी, हडपसर फाटा, मगरपट्टा (दक्षिण), मगरपट्टा मध्य, मगरपट्टा (उत्तर), हडपसर रेल्वे स्थानक, साईनाथनगर, खराडी चौक आणि खराडी बायपास अशी 22 मेट्रो स्थानके निश्चित करण्यात आली आहेत. नळ स्टॉप ते वारजे माणिकबाग ( 6.12 किमी 6 स्थानके) माणिकबाग, दौलतनगर, वारजे, डहाणूकर कॉलनी, कर्वे पुतळा आणि नळ स्टॉप ही 6 मेट्रो स्थानके आहेत.
या स्थानकावरील विद्युत आणि सौर यंत्रणांची सुविधा, तसेच अग्निसुरक्षेपासून ते हरित इमारतीच्या दृष्टीने नैसर्गिक स्त्रोतांचा पुरेपूर वापर, स्वच्छतागृहे, उपाहारगृहे, वस्तू विक्री दुकाने, ध्वनियंत्रणा आणि इतर मानकांनुसार देखभाल दुरुस्ती आदींचा विचार करून अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित कंपनीची नियुक्ती करण्यात येणार आहे.