Pune Fraud Case: पुणे : मुलीचा दुर्धर आजार पूर्णपणे बरा व्हावा, या आशेने उपचारासाठी धडपड करणारे एक दाम्पत्य भोंदू बाबाच्या जाळ्यात अडकले. मदत करण्याचे आमिष दाखवत त्या दाम्पत्याची तब्बल 14 कोटीची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना पुण्यात उघड झाली आहे. मुलीच्या आजारपणावर उपाय सांगत आरोपींनी दाम्पत्याचा विश्वास संपादन केला. त्यानंतर विविध कारणे सांगून मोठी आर्थिक मदत मागण्यात आली. अखेर त्या दाम्पत्याकडून एकूण 14 कोटींची रक्कम घेतल्याचे समजते. Pune Crime

कोथरूड येथील रहिवासी असलेल्या दाम्पत्याने पुणे पोलिसांना या प्रकरणी फिर्याद दिली. पोलिसांनी याकडे गांभीर्याने लक्ष देत तीन आरोपींना ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडून 54 लाख रोख रक्कम जप्त केली. तपासात असे उघड झाले की आरोपींच्या 39 वेगवेगळे बॅंक खाते होते. त्यापैकी, 13 खात्यांमध्ये मिळून 1,139 संशयास्पद आर्थिक व्यवहार झाल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणात वेदिका कुणाल पंढरपूरकर (वय 41), कुणाल वैजनाथ पंढरपूरकर (वय 42) – दोघे रा. कोथरूड, महात्मा सोसायटी – आणि दीपक जनार्दन खडके (वय 65), रा. वाडीवरे, नाशिक यांना अटक करण्यात आली आहे. याशिवाय वेदिकाच्या आई आणि भावाविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस तपासात असे निष्पन्न झाले की, तिन्ही आरोपींनी मिळून दाम्पत्याकडून 14 कोटी 39 लाख 20 हजार रुपये उकळल्याचे निष्पन्न झाले आहे. या पैशांतून आरोपींनी काही मालमत्ता व वाहने खरेदी केली असून, त्यासंबंधीचे 6 ते 7 नोंदणी दस्त पोलिसांनी संबंधित विभागाकडून मिळवले आहेत.
आरोपींच्या 13 बँक खात्यांचे तपशील मिळाल्यानंतर त्यांना गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांच्या ताब्यातून वाहने, लॅपटॉप तसेच 54 लाख रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. फसवणुकीतील रक्कम कुठे आणि कशी वापरली याची चौकशी सुरू असल्याचे तपास अधिकारी पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस यांनी सांगितले.
आरोपींनी काही मालमत्ता विक्रीद्वारे विल्हेवाट लावल्याची शक्यता असल्याचे नमूद करत 6 दिवसांची पोलीस कोठडी मागितली. तर तक्रारदारांच्या वतीने ॲड. विजयसिंह ठोंबरे यांनी बाजू मांडली. या घटनेनंतर पुण्यात एकच खळबळ उडाली आहे.






