Nanded Accident News: नांदेड: शहरातून एक ह्रदयद्रावक घटना समोर आली आहे. वाढदिवसाच्या अदल्या दिवशीच एका चार वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर संपूर्ण गाव हादरले आहे. आजोबांसोबत मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या या मुलाला एका हायवा ट्रकने धडक दिली आणि या धडकेत त्याचा मृत्यू झाला. तर आजोबा गंभीर जखमी असून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

हेही वाचा- पुण्यात उपचाराच्या नावाखाली फसवणूक, तब्बल 14 कोंटीचा लावला गंडा, तिघांना अटक
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी नांदेड शहरातील कौठा पीव्हीआर जवळ ही घटना घडली. मृत चिमुकल्याचे नाव प्रणव संपात आचार्य (वय 4) असून तो मूळचा आंबाजोगाई (जि. बीड) येथील आहे. दोन दिवसांपूर्वीत प्रणव आपल्या आजोळी आला होता. विशेष म्हणजे, शनिवारी त्याचा पाचवा वाढदिवस होता. पण वाढदिवसाच्या आधीच्या दिवशीच एका भीषण अपघातात त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर कुटुंबियांनी पोलीस कार्यालयासमोर आंदोलन केले आहे.
शुक्रवारी सकाळी प्रणव आपल्या आजोबां (राजेश) सोबत वॉकला गेला होता. दोघे ही पीव्हीआर समोरून घरी परतत असताना समोरच्या दिशेने येणाऱ्या 14 टायर रिकाम्या हायवा (क्र. RJ-04 JD-8751) ने त्यांना जोराची धडक दिली. या धडकेत प्रणवच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. राजेश यांच्या कंबरेला गंभीर दुखापत झाली असून त्यांना तत्काळ विष्णूपुरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले. संतप्त जमावाने हायवावर दगडफेक केली आणि हायवा चालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी चालक केसरराम ठाणारामा (वय 40, पडमेरा, राजस्थान) याला अटक केली आहे. तो नांदेड–जालना समृद्धी महामार्गावर मुरूम वाहतूक करण्याच्या कामावर होता, अशी माहिती समोर आली आहे.
घटनेनंतर नातेवाईक आणि नागरिकांनी पोलिस महानिरीक्षक कार्यालयात आंदोलन केले. पोलिसांनी जमावाला रोखण्यासाठी बंदोबस्त तैनात केला आहे.
दोन दिवसांपूर्वी Pranav आपल्या आईसोबत आजोळी आला होता. आज त्याचा पाचवा वाढदिवस साजरा होणार होता. मात्र, त्याच्या आधीच हा भीषण अपघात घडल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.






