Pune Cyber Crime : पुणे : शहरात सायबर फसवणुकीच्या घटना पुन्हा वाढताना दिसत आहेत. कॅम्प परिसरातील 84 वर्षांच्या एका वृद्ध महिलेला अज्ञात फोन करून स्वतःला पोलीस अधिकारी सांगत चोरट्यांनी तब्बल 97 लाख 47 हजार रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी शिवाजीनगर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, 27 मार्च ते 7 एप्रिल 2026 या कालावधीत हा प्रकार घडला. महिलेच्या फोनवर आलेल्या कॉलमध्ये आरोपीने तिच्या नावावर असलेला मोबाईल क्रमांक जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात वापरला गेला असल्याचे सांगितले. ही माहिती ऐकून महिला घाबरली. त्यानंतर आरोपींनी या प्रकरणाचा तपास आरबीआयकडून सुरू असल्याचे सांगून तिला अटक होऊ शकते, अशी भीती दाखवली.

भीतीच्या वातावरणात आरोपींनी महिलेला दोन वेगवेगळ्या बँक खात्यांमधून पैसे ट्रान्सफर करण्यास भाग पाडले. अशा प्रकारे तिच्याकडून एकूण 97 लाख 47 हजार रुपये उकळण्यात आले. काही दिवसांनी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार केली. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक संगीता देवकाते करत आहेत.
दरम्यान, अशाच प्रकारच्या दुसऱ्या घटनेत वानवडी येथील 63 वर्षांच्या व्यक्तीला पार्सलमध्ये ड्रग्ज आढळल्याचे सांगून 29 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. आरोपींनी स्वतःला सायबर अधिकारी सांगत बनावट कागदपत्रांच्या आधारे ही रक्कम उकळली.
या वाढत्या घटनांमुळे नागरिकांनी अनोळखी कॉल आणि मेसेजपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. कोणतीही वैयक्तिक किंवा आर्थिक माहिती देताना काळजी घेणे गरजेचे असल्याचेही सांगितले आहे.







