पुणे: बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Baramati Election) राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. अजित पवार गटाकडून बोलावणे आल्यास आपण सुनेत्रा पवारांच्या (Sunetra Pawar) प्रचाराला जाण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. (Maharashtra Politics)

“माझा रोल मतदानाला जाण्याचा आहे. शेवटी रिश्तेही मायने रखते है,” असे म्हणत त्यांनी कुटुंबीय नात्यांना प्राधान्य असल्याचे स्पष्ट केले. सुनेत्रा पवारांच्या प्रचाराबाबत विचारले असता, हा प्रश्न अजित पवार गटाने विचारायला हवा, असे सांगत त्यांनी थेट उत्तर देणे टाळले, पण बोलावले तर प्रचाराला जाण्याची तयारी दर्शवली.

बारामती पोटनिवडणूक बिनविरोध का झाली नाही, याबाबतही त्यांनी सूचक टिप्पणी केली. “याचे उत्तर अजित पवार गटालाच विचारा, कारण सगळी मॅनेजमेंट त्यांच्याकडे होती,” असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे अजित पवार गटावर टीका केली.
त्या पुढे म्हणाल्या की, निवडणुकीच्या काळात कार्यकर्ते लढण्यास उत्सुक असतात, त्यामुळे अनेक गोष्टी घडत असतात. काल दिवसभर त्या बारामतीत नव्हत्या, त्यामुळे नेमक्या घडामोडींची माहिती नसल्याचेही त्यांनी सांगितले.
“पैसा आणि सत्ता यापेक्षा कुटुंब महत्त्वाचे आहे. त्यामुळेच मी नेहमी म्हणते, रिश्ते मायने रखते है,” असे सांगत त्यांनी संपूर्ण कुटुंब सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी असल्याचेही स्पष्ट केले.
सुप्रिया सुळे या विठ्ठल दर्शनासाठी आल्या असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांच्या या वक्तव्यामुळे बारामती पोटनिवडणुकीत राजकीय चर्चांना आणखी वेग आला आहे.







