पुणे: गुढीपाडव्याच्या दिवशी पुण्यात माजी महापौरांच्या बंगल्याबाहेर धक्कादायक प्रकार घडला आहे. एका अज्ञात महिलेनं पुण्याच्या माजी महापौरांच्या घरासमोर नारळ, दही-भात, उकडलेली अंडी, लिंबु, काळा अभिर हे सामान ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शनिवारी (29 मार्च) ला अमावस्या असल्याने ही महिला जादूटोणा करण्यासाठी आली असता पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं. विवेक नामदेव पाटील (वय 62) यांच्या फिर्यादीनुसार महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिला धनकवडी परिसरातील एका सोसायटीमध्ये मागील चार महिन्यापासून फक्त अमावस्याच्या दिवशी लोकांच्या घरासमोर नारळ, दही-भात, उकडलेली अंडी, लिंबु, काळा अभिर ठेवत होती. तसेच शनिवार (29 मार्च ) तारखेला रात्री 8 वाजण्याच्या सुमारास अमावस्याच्या दिवशी माजी महापौर दत्ता धनकवडे यांच्या बंगल्याच्या समोर नारळ, दही-भात, उकडलेली अंडी, लिंबु, काळा अभिर ठेवला. यावेळी परिसरातील लोकांनी तिला पाहिले. त्यानंतर पोलिसांना कळवले. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहचत महिलेला अटक केली.
जादूटोणा प्रतिबंधक अधिनियम 2013 नुसार कारवाई
याप्रकरणी दिलेल्या तक्रारीच्या आधारे जादूटोणा प्रतिबंधक अधिनियम 2013 च्या कलम 3 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहकारनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल गोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.