Pune Crime : पुणे, ता. 26 : पुण्यातील टिंबर मार्केटमधील एका व्यापाऱ्याचे व्यवसायातील आर्थिक देवाणघेवाणीच्या वादातून अपहरण करून दीड कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या आरोपींना गुन्हे शाखा युनिट-2 च्या पथकाने अटक केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना ताब्यात घेतले आहे.

जयेश ओसवाल (वय 29, रा. गुलटेकडी) असे अपहरण झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. तर सौरभ विश्वनाथ पवार (वय 27, रा. बावधन), शिरीष खोपडे (वय 26, रा. आंबेगाव), मंदार श्रीधर दारवटकर (वय 30, रा. वडगाव), साहिल श्रीकांत खुटवड (रा. भिलारेवाडी) आणि प्रणव बबन निवगुणे (वय 23, रा. आंबेगाव) अशी आरोपींची नावे आहेत. या सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी जयेश ओसवाल यांची पत्नी प्रांजल ओसवाल यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयेश ओसवाल यांचे टिंबर मार्केटमध्ये दुकान आहे. 23 मार्च रोजी ते दुकानात गेले होते, मात्र रात्री उशिरापर्यंत घरी परतले नाहीत. 24 मार्च रोजी पहाटे 1 वाजण्याच्या सुमारास प्रांजल यांना त्यांच्या पतीचा व्हॉट्सअॅप कॉल आला. त्यामध्ये काही जणांनी त्यांचे अपहरण करून ठेवल्याचे सांगत दीड कोटी रुपयांची मागणी करण्यात आली.

तक्रार मिळताच स्वारगेट पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. गुन्हे शाखा युनिट-2 ने तांत्रिक माहितीच्या आधारे नसरापूर (ता. भोर) परिसरात छापा टाकून आरोपींना पकडले आणि जयेश ओसवाल यांची सुखरूप सुटका केली. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.







