Pune Crime : दौंड, ता. 30 : घराला कुलूप लावून कुटुंबासह बाहेर गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्याच्या घरावर अज्ञात चोरट्याने डल्ला मारला आहे. चोरट्यांनी घरातील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा तब्बल 3 लाख 75 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. ही घटना बालाजीनगर परिसरात घडली असून 27 मार्च रोजी रात्रीच्या सुमारास उघडकीस आली आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
सोमनाथ संताजी खाडे (वय 44, रा. स्वामी समर्थ अपार्टमेंट, बिलावल गार्डन, बालाजीनगर, दौंड) यांनी दौंड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सोमनाथ खाडे हे रायगड पोलिस दलात पोलिस हवालदार म्हणून कार्यरत असून सध्या ते सोलापूर येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रात तात्पुरत्या नियुक्तीवर आहेत. खाडे हे पत्नी प्रतिभा व मुलींसह घराला कुलूप लावून 22 मार्च रोजी सकाळी सोलापूरला गेले होते.

दरम्यान, 27 मार्च रोजी सायंकाळी शेजारी निता वाघ यांनी फोन करून “तुमच्या घराचे कुलूप दिसत नाही” अशी माहिती दिल्यानंतर खाडे कुटुंबाने तातडीने दौंडकडे धाव घेतली. रात्री सुमारे सव्वा बारा वाजता घरी पोहोचल्यावर मुख्य दरवाजाचे कुलूप तुटलेले व कडी उघडी असल्याचे दिसून आले. घरात प्रवेश करताच बेडरूममधील कपाटे उघडी पडलेली आणि कपडे अस्ताव्यस्त फेकलेले दिसले. लोखंडी कपाटातील लॉकर उघडून त्यात ठेवलेले सोन्याचे दागिने गायब असल्याचे लक्षात आले. तसेच लाकडी कपाटातील डब्यात ठेवलेली 30 हजार रुपयांची रोख रक्कमही चोरीस गेल्याचे स्पष्ट झाले.
22 मार्च सकाळी 8 ते 27 मार्च रात्री 8 वाजून 45 मिनिटांच्या कालावधीत अज्ञात चोरट्याने कुलूप तोडून घरात प्रवेश करून घरातील 3 लाख 75 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. यामध्ये कानातील झुंबे, अंगठ्या, सोन्याचे मणी, नथ, टॉप्स, बदाम तसेच चांदीचे पायातील दागिने यांचा समावेश आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 305, 331(3), 331(4) अंतर्गत दौंड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस हवालदार ढुके करत आहेत.







