पुणे: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (Pune Crime) परीक्षेत गैरप्रकार करण्याचा प्रकार पुण्यात उघडकीस आला असून, डमी परीक्षार्थी म्हणून बसलेल्या तरुणाला रंगेहात पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. सीबीएसईकडून कनिष्ठ लेखापाल आणि सहायक पदांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या परीक्षेत मूळ उमेदवाराऐवजी दुसराच व्यक्ती परीक्षा देत असल्याचे समोर आले असून, या प्रकरणामुळे स्पर्धा परीक्षांतील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
ही घटना 1 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी साडेनऊ वाजता औंध येथील डीएव्ही पब्लिक स्कूलमधील परीक्षा केंद्रावर घडली. परीक्षेसाठी आलेल्या उमेदवारांची कागदपत्रे तपासली जात असताना पर्यवेक्षिका राधिका कार्तिक यांच्या संशयावरून हा प्रकार उघड झाला. ओळखपत्र आणि प्रत्यक्ष व्यक्तीमध्ये विसंगती आढळल्यानंतर त्यांनी चौकशी केली असता, संबंधित तरुण हा मूळ उमेदवार नसल्याचे स्पष्ट झाले.

या प्रकरणात अमित कमलसिंग शर्मा (वय 25, रा. न्यांगल छोटी, ता. सिंधमुख, जि. चुरु, राजस्थान) याला डमी परीक्षार्थी म्हणून अटक करण्यात आली आहे. तर मूळ परीक्षार्थी धमेंदर संजीव कुमार (वय 22, रा. नौताना, महेंद्रगड, हरियाना) याच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पर्यवेक्षिकेने तात्काळ बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना माहिती दिल्यानंतर ही कारवाई झाली.
या घटनेबाबत चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. सीबीएसईसारख्या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांमध्ये अशा प्रकारचे गैरप्रकार घडणे गंभीर बाब मानली जात असून, भविष्यात ओळख तपासणी आणि देखरेख अधिक कडक करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.






