Hadapsar Sex Racket पुणे, ता. 10 : पुण्यातील हडपसर परिसरात मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या कथित देहव्यापार रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने (AHTC) शुक्रवारी (ता.८) केलेल्या धडक कारवाईत पाच पीडित तरुणींची सुटका करण्यात आली असून मसाज सेंटरच्या व्यवस्थापिकेला ताब्यात घेण्यात आले आहे. Hadapsar Sex Racket
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर गाडीतळ परिसरातील वैभव थिएटर शेजारी असलेल्या ‘एस.पी. बॉडी फिटनेस’ या स्पा सेंटरवर ८ मे रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास कारवाई करण्यात आली. या ठिकाणी स्पा मॅनेजर तथा मालकीण आशा मुकेश गोरे (वय ५५, रा. हांडेवाडी, हडपसर) ही महिलांना पैशांचे आमिष दाखवून देहव्यापारासाठी प्रवृत्त करत असल्याचे समोर आले.
तपासादरम्यान संबंधित महिलांकडून स्पाच्या नावाखाली वेश्याव्यवसाय करवून घेतला जात असून त्यातून मिळणाऱ्या पैशातून आरोपी स्वतःची उपजीविका भागवत असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 143(1)(3) तसेच अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायदा 1956 अंतर्गत कलम 3, 4 आणि 5 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी महिलेला ताब्यात घेतले असून या रॅकेटमागील इतर संबंधितांचा शोध सुरू आहे.
दरम्यान, या कारवाईमुळे हडपसर परिसरात मोठी खळबळ उडाली असून स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या बेकायदेशीर व्यवसायांवर पोलिसांनी कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.







