Pune Murder Case पुणे, ता. १० : पुण्यातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या नांदेड सिटी परिसरात सुनेची निर्घृण हत्या करून फरार झालेल्या सासऱ्याला अखेर जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. तब्बल आठ दिवस पोलिसांना चकवा देणारा आरोपी भानुदास भास्कर चौधरी याला जळगावमधील मेहरूण परिसरातून शिताफीने अटक करण्यात आली. Pune Murder Case

२ मे रोजी नांदेड सिटी परिसरात ही थरारक घटना घडली होती. घरगुती वादातून संतापलेल्या भानुदास चौधरी याने आपल्या सून स्वाती तेजस चौधरी हिच्यावर डोक्यात वार करत तिची हत्या केली होती. धक्कादायक बाब म्हणजे, गुन्हा केल्यानंतर आरोपीने घराला बाहेरून कुलूप लावून घटनास्थळावरून पलायन केले होते. Pune Murder Case
या प्रकरणी हवेली पोलीस ठाणे अंतर्गत नांदेड सिटी चौकीत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुणे पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू असतानाच तो जळगाव शहरातील मेहरूण गाव परिसरात लपल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली.
माहिती मिळताच जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तातडीने सक्रिय झाले. मेहरूण येथील महादेव मंदिर परिसरात सापळा रचत पोलिसांनी आरोपीला अत्यंत शिताफीने ताब्यात घेतले. फरार आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे कौतुक होत आहे.
अटक करण्यात आलेल्या भानुदास चौधरी याला प्राथमिक चौकशीनंतर पुढील तपासासाठी पुणे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या हत्याकांडामुळे नांदेड सिटी परिसरात भीती आणि खळबळ निर्माण झाली असून कौटुंबिक वादाचे टोक किती भयावह असू शकते, याची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.







