Big News लोणी काळभोर, ता. १० : पुणे-हैदराबाद दरम्यान प्रस्तावित करण्यात आलेल्या हायस्पीड रेल्वे अर्थात बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे पुणे जिल्ह्याच्या विकासाला नवी गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात पुण्याचे मुख्य बुलेट ट्रेन स्थानक लोणी काळभोर आणि मांजरी बुद्रुक दरम्यान प्रस्तावित करण्यात आल्याची माहिती समोर आली असून, त्यामुळे लोणी काळभोर परिसर चर्चेत आला आहे. Big News
रेल्वे मंत्रालयाने तयार केलेल्या प्राथमिक ‘रेल्वे अॅटलास’मध्ये पुणे-हैदराबाद हायस्पीड रेल्वे मार्गाची प्राथमिक आखणी दर्शविण्यात आली आहे. या मार्गामुळे मुंबई, पुणे, बारामती, पंढरपूर, सोलापूर आणि हैदराबाद ही महत्त्वाची शहरे अतिवेगवान रेल्वेने जोडली जाणार आहेत. Big News

मुंबई ते पुणे अवघ्या ४८ मिनिटांत!
केंद्रीय अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलेल्या सात हायस्पीड रेल्वे मार्गांमध्ये महाराष्ट्रातील दोन मोठ्या मार्गांचा समावेश करण्यात आला आहे. त्यात मुंबई-पुणे आणि पुणे-हैदराबाद या मार्गांचा समावेश आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी यापूर्वी दावा केला होता की, मुंबई ते पुणे हा प्रवास अवघ्या ४८ मिनिटांत पूर्ण होईल, तर पुणे ते हैदराबाद हा प्रवास दोन तासांच्या आत म्हणजेच सुमारे १ तास ५५ मिनिटांत शक्य होणार आहे. सध्या सुरू असलेला अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्प पुढे पुणे आणि हैदराबादपर्यंत विस्तारला जाणार असल्याचेही सांगितले जात आहे. Big News
पुणे जिल्ह्यात चार मोठी स्थानके प्रस्तावित
प्राथमिक आराखड्यानुसार पुणे जिल्ह्यात हायस्पीड रेल्वेची चार महत्त्वाची स्थानके प्रस्तावित आहेत. मुंबईहून पुण्याकडे येताना पहिले स्थानक लोणावळा परिसरात मळवली आणि कामशेत दरम्यान असेल. त्यानंतर पिंपरी-चिंचवडसाठी कुरुळी येथे स्थानक प्रस्तावित करण्यात आले आहे. तिसरे आणि सर्वात महत्त्वाचे स्थानक लोणी काळभोर आणि मांजरी बुद्रुक यांच्या दरम्यान प्रस्तावित असून, हेच स्थानक “पुणे बुलेट ट्रेन स्टेशन” म्हणून विकसित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यानंतर रेल्वे मार्ग शिंदवणे मार्गे बारामतीच्या दिशेने जाणार असून, बारामती शहराबाहेर आणखी एक स्थानक प्रस्तावित आहे. Big News
हवेली तालुक्यातील अनेक गावांमधून जाणार मार्ग
या बुलेट ट्रेन प्रकल्पाचा मार्ग हवेली तालुक्यातील अनेक गावांमधून जाणार असल्याने मोठ्या प्रमाणावर भूसंपादन होण्याची शक्यता आहे. मोशी, धुळगाव, चऱ्होली बुद्रुक, चिखली, निरगुडी, वडगाव शिंदे, लोहगाव, वाघोली, मांजरी खुर्द, मांजरी बुद्रुक, शेवाळवाडी, फुरसुंगी, कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, रामोशीवाडी, आळंदी म्हातोबाची, तरडे, वळती आणि शिंदवणे या गावांचा प्राथमिक आराखड्यात समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.
पंढरपूर-सोलापूरलाही मोठा फायदा
या हायस्पीड रेल्वेमुळे पंढरपूर आणि सोलापूर ही दोन महत्त्वाची शहरेही थेट जोडली जाणार आहेत. जरी स्थानके शहराबाहेर प्रस्तावित असली तरी या प्रकल्पामुळे आजूबाजूच्या भागांचा झपाट्याने विकास होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संपूर्ण मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेन मार्ग सुमारे ६५० किलोमीटर लांबीचा असणार असून, त्यासाठी १७.५ मीटर रुंदीची जागा भूसंपादनाद्वारे घेण्यात येणार आहे. या मार्गावर एकूण ११ स्थानके प्रस्तावित आहेत.
पुणे जिल्ह्यातील ९० गावांवर परिणाम
ही बुलेट ट्रेन पुणे जिल्ह्यातील मावळ, खेड, हवेली, पुरंदर, दौंड, बारामती आणि इंदापूर तालुक्यातील तब्बल ९० गावांमधून जाणार आहे. पुणे जिल्ह्यातील कुरवंडे-लोणावळा येथून मार्गाची सुरुवात होऊन इंदापूर तालुक्यातील चाकाटी हे शेवटचे गाव असणार आहे. त्यानंतर हा मार्ग सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. या प्रकल्पामुळे पुणे जिल्ह्यातील वाहतूक, उद्योग, रोजगार, रिअल इस्टेट आणि ग्रामीण भागातील विकासाला मोठी चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. Big News






