प्रतिनिधी अमित मुंडीक

Pune Crime: पुणे : शहर गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक-1 ने धडाकेबाज कारवाई करत सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्टल व चार जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. ही कारवाई 18 जानेवारी 2026 रोजी करण्यात आली. पथक पेट्रोलिंगवर असताना पोलिस अंमलदार अमोल आवाड व मयुर भोकरे यांना गुप्त माहिती मिळाली की, वारजे माळवाडी पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरील आरोपी सागर गणेश सुतार (वय 25, रा. वारजे) याच्याकडे गावठी पिस्टल असून तो शिवणे येथील देशमुखनगर परिसरातील मोकळ्या जागेत बसला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तत्काळ कारवाई केली. आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर अंगझडतीदरम्यान सिल्व्हर रंगाचे गावठी पिस्टल व मॅगझिनमधील चार जिवंत काडतुसे आढळली. जप्त शस्त्रांची अंदाजे किंमत 40 हजार 800 रुपये आहे, अशी माहिती देण्यात आली.

या प्रकरणी उत्तमनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 05/2026 कलम आर्म्स अॅक्ट 3(25) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 37(1), 135 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीवर यापूर्वीही खुनाचा प्रयत्न, चोरी आणि आर्म्स अॅक्टअंतर्गत गुन्हे नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंकज देखमुख, पोलीस उपायुक्त (गुन्हे) निखील पिंगळे व सहायक पोलीस आयुक्त विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पोलिस उपनिरीक्षक रामेश्वर पार्वे व त्यांच्या पथकाचा सहभाग होता.






