Pune Crime: पुणे : पुणे ग्रामीण पोलिसांनी अमली पदार्थ तस्करीविरोधात मोठी कारवाई करत रांजणगाव एमआयडीसी परिसरात मेफेड्रोन म्हणजेच एमडी ड्रग्जचा साठा उघड केला आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि रांजणगाव पोलिसांनी संयुक्त कारवाई करून सुमारे 34 ग्रॅम वजनाचा आणि अंदाजे 680000 रुपये किमतीचा अमली पदार्थ जप्त केला आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी दि. 16 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर आणि रांजणगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक महादेव वाघमोडे यांचे पथक गस्त घालत होते. यावेळी गणेगाव रोडवरील संकल्प सिटी परिसरात अमली पदार्थांची विक्री होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीनुसार पोलिसांनी तत्काळ सापळा रचून छापा टाकला.
या कारवाईत प्रशांत फक्कड मावळे (वय 24, रा. रांजणगाव, मूळ रा. मलठण, ता. शिरूर) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून 34 ग्रॅम एमडी ड्रग्जसह इलेक्ट्रिक वजन काटा आणि स्टील प्लेट असा एकूण सुमारे 680000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीकडे हा अमली पदार्थ कुठून आला आणि तो कोणाला विकणार होता, याचा तपास रांजणगाव पोलीस करत आहेत.
औद्योगिक वसाहतीत अशा प्रकारे अमली पदार्थांची विक्री होत असल्याचे समोर आल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. पोलिसांकडून अशा कारवाया पुढेही सुरू ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.







