Pune Crime : पुणे : पुणे जिल्ह्यातील औद्योगिक पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सणसवाडी परिसरात सीमाशुल्क विभागाने अमली पदार्थांच्या विरोधात मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत सुमारे 1 कोटी 79 लाख रुपये किमतीचे मेफेड्रॉन (MD) जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणात एका संशयित तस्कराला अटक (Arrest) करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. कुरकुंभ येथे उघड झालेल्या ड्रग्ज प्रकरणानंतर पुणे ग्रामीण भागात झालेली ही मोठी कारवाई मानली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सीमाशुल्क विभागाच्या अमली पदार्थविरोधी पथकाला गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीनुसार सणसवाडी येथील एका सोसायटीतील फ्लॅटवर अचानक छापा टाकण्यात आला. तपासणीदरम्यान या फ्लॅटमधून 898 ग्रॅम 94 मिलीग्रॅम मेफेड्रॉन आढळून आले. या अमली पदार्थाची बाजारातील किंमत सुमारे 1 कोटी 79 लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले.
या प्रकरणी राजस्थानमधील जोधपूर येथील सागरमल उर्फ सागर बिश्नोई (वय 26) याला अटक करण्यात आली आहे. तो सणसवाडी येथील फ्लॅटमध्ये भाड्याने राहत होता. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार तो याच ठिकाणावरून पुणे जिल्ह्यातील औद्योगिक भागात ड्रग्जचा पुरवठा करत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
सीमाशुल्क विभागाचे अधिकारी महेंद्र पांचाल यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. आरोपीविरोधात अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार (NDPS Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयात झालेल्या सुनावणीत सरकारी पक्षाने या प्रकरणात मोठ्या रॅकेटचा संबंध असण्याची शक्यता व्यक्त केली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ पुण्यात कसे आले आणि यामागे आंतरराज्य टोळी आहे का, याचा तपास करण्याची गरज असल्याचेही सांगण्यात आले.
दरम्यान, न्यायालयाने आरोपीला पुढील तपासासाठी पोलीस कोठडी सुनावली आहे. औद्योगिक भागात तरुणांना नशेच्या जाळ्यात ओढणाऱ्या तस्करांवर झालेल्या या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा तपास पुढे सुरू आहे.







