पुणे: पुण्यातील विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतुन धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे लग्न होऊन 4 वर्षे झाली तरीही मूल होत नसल्याच्या कारणावरुन पतीने दुसरे लग्न करून दुसऱ्या मुलीला घरी आणल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात पतीसह सासु-सासऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रविणकुमार सॅमियल गोलपल्ली (वय 33 वर्ष), सासु जयम्मा सॅमियल गोलपल्ली (वय 50 वर्ष) आणि सासरे सॅमियल ओबेय्या गोलपल्ली (वय 54 वर्ष, रा. बालाजी निवास, मांजरी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत एका 33 वर्षीय विवाहितेने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विवाहित महिलेचा आरोपी प्रविणकुमार गोलपल्ली याच्याबरोबर 2021 मध्ये विवाह झाला होता. फिर्यादी महिलेला मुल होत नाही. तसेच तिच्या घरच्यांकडून पैसे आणण्यासाठी महिलेचा छळ केला जात होता. महिलेच्या वडिलांचे घर आपल्या नावावर करावे, यासाठी पती प्रविणकुमार हा तिचा मानसिक व शारीरिक छळ करत होता.
आरोपी पतीने फिर्यादीबरोबर लग्न झाले असतानाही आणखी एका मुलीसोबत लग्न केले. लग्न केल्यानंतर तो तिला घरी घेऊन आला. याप्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात पतीसह सासु सासऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक नवनाथ क्षीरसागर तपास करीत आहेत.