पुणे: पुण्यातील ताडीवाला रोड परिसरात किरकोळ (Pune Crime) कारणावरून दोन शेजाऱ्यांमध्ये झालेला वाद थेट पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे या वादाचे कारण ठरले ते एका घरातील पोपट आणि दुसऱ्या घरातील मांजर. या किरकोळ कारणावरून सुरू झालेल्या वादाचे रूपांतर अखेर मारहाणीमध्ये झाले असून पोलिसांनी मांजरीच्या मालकाविरोधात गुन्हा नोंदवला आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, ताडीवाला रोड परिसरातील भारत तरुण मंडळाजवळ अभिषेक सिंग हे आपल्या कुटुंबासह राहतात. त्यांनी आपल्या घरात पोपट पाळला असून त्याचा पिंजरा घरासमोर ठेवलेला असतो. त्यांच्या शेजारी राहणारे दिनेश रंगराव पोताबत्तोनी यांनी मांजर पाळले आहे. ही मांजर परिसरात मोकळेपणाने फिरत असल्याने ती वारंवार सिंग यांच्या घरासमोर येऊन पोपटाच्या पिंजऱ्याजवळ चाळे करत असल्याचे सांगितले जाते.

काही वेळा या मांजरीने पोपटाचा पिंजरा ढकलल्याचीही घटना घडल्याने सिंग यांना त्याचा त्रास होत होता. त्यामुळे त्यांनी शेजारी दिनेश पोताबत्तोनी यांना मांजरीवर लक्ष ठेवण्यास सांगितले. मात्र या मुद्द्यावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला. सुरुवातीला तोंडी वाद झाला, पण काही वेळातच दोन्ही कुटुंबातील सदस्य यात सहभागी झाल्याने परिस्थिती अधिक चिघळली.

वाद वाढत गेल्यानंतर दोन्ही बाजूंचे लोक घराबाहेर येऊन एकमेकांशी शिवीगाळ आणि धक्काबुक्की करू लागले. काही क्षणांतच हा वाद हाणामारीपर्यंत पोहोचला. या मारहाणीत अभिषेक सिंग यांना दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे.
घटनेनंतर अभिषेक सिंग यांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी या तक्रारीची दखल घेत मांजरीचे मालक दिनेश रंगराव पोताबत्तोनी यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, एका मांजर आणि पोपटामुळे शेजाऱ्यांमध्ये एवढा मोठा वाद झाल्याची चर्चा परिसरात रंगली असून किरकोळ कारणांवरून वाढणारे वाद कसे गंभीर स्वरूप धारण करू शकतात, याचे हे उदाहरण ठरत आहे.







